“आम्हाला पुरस्कार नको, सेवेत कायम करा”, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत बालकांचे प्राण वाचवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुरस्काराऐवजी सेवेत कायम करण्याची आग्रही मागणी केलीय. विजय वडेट्टीवार यांनी व्यवस्थेवर रोष व्यक्त केला आहे.

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून बालकांना आगीतून सुखरूप बाहेर काढणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वडेट्टीवार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.”आम्हाला पुरस्कार नको, सेवेत कायम करा,” अशी आग्रही मागणी या कर्मचाऱ्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केली. स्वतःचा जीव पणाला लावून कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना महिन्याला केवळ आठ हजार रुपये मानधन मिळत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी कंत्राटी पद्धतीवरून राज्य सरकार आणि कंत्राटदार व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला.
आगीच्या घटनेच्या वेळी नवजात बालकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं विजय वडेट्टीवार यांनी कौतुक केलं. मात्र, या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. अनेक वर्षांपासून रुग्णालयात प्रामाणिकपणे काम करूनही आपल्याला सेवेत कायम केलं जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आम्हाला कोणताही विशेष पुरस्कार नको, तर आमचे प्रमोशन करून आम्हाला कायमस्वरूपी नोकरी द्या,” अशी आग्रही भावना कर्मचाऱ्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे व्यक्त केली. यातील काही कर्मचारी तब्बल 17 वर्षांपासून अविरत काम करत आहेत; मात्र असं असूनही त्यांच्या खात्यात दरमहा केवळ आठ हजार रुपये मानधन जमा होत असल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आली.
25 हजारांचा खर्च हातात केवळ आठ हजार : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत गंभीर आरोप करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, काही कर्मचाऱ्यांच्या नावावर शासकीय तिजोरीतून सुमारे 22 ते 25 हजार रुपये काढले जातात; मात्र प्रत्यक्षात त्यांच्या हातात केवळ आठ हजार रुपयेच दिले जातात. या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम आणि ओव्हरटाईम करून घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “तुम्ही 17 वर्षांपासून काम करत आहात आणि तरीही खात्यात फक्त आठ हजार रुपये जमा होतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असं वडेट्टीवार यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं. “तुम्हाला तुमच्या हक्काचं पूर्ण मानधन मिळालंच पाहिजे, हीच आमची भूमिका असेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

