‘एचटीबीटी’ची घुसखोरी, कसा घालणार आवर?
विक्रेत्यांनी बदलले बियाणे विक्रीचे कार्यक्षेत्र, पाच कारवायांनी पुष्टी

अमरावती : यापूर्वी जिल्हा व राज्य सीमालगतच्या भागात एचटीबीटी बियाणे विकले जायचे. यंदा पाचही कारवाया अन्य तालुक्यात झाल्या आहेत. म्हणजेच या बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र घुसखोरी झाली आहे. त्यामुळे याला आवर घालण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.
या बियाण्यांना केंद्र शासनाने मान्यता दिलेली नाही. या बियाण्यांच्या विक्रीस शासनाचा प्रतिबंध आहे. तरीही चोरट्या मार्गाने या बियाण्यांची विक्री होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात अमरावती, येवदा, अंजनगाव सुर्जी, पथ्रोट व परतवाडा पोलिस ठाण्यांतर्गत कृषी विभागाच्या पथकाने धाड मारून प्रतिबंधित बियाणे जप्त केले. संबंधित ठाण्यामध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी एचटीबीटीच्या कारवाया धामणगाव परिसर, वरुड व अमरावती येथे झालेल्या होत्या. जिल्हा सीमा किंवा राज्य सीमांलगतच्या गावांमध्ये चोरबीटीच्या विक्री व्हायची. मात्र, यामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने या परिसरात यंदा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चोरट्यांनी बियाणे विक्रीचे कार्यक्षेत्र बदलल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांनी कुठल्याही आमिषांना बळी पडू नये, परवानाधारक केंद्रांतून बियाणे खरेदी करावे व पक्की पावती घ्यावी, अशा प्रकारच्या बियाण्यांची विक्री होत असल्यास पथकाला माहिती द्यावी.
उज्वल आगरकर, एसडीओ (कृषी), मोर्शी
बियाण्यांद्वारेफसवणूक या बियाण्यांमध्ये उत्पादक, विपणन, याशिवाय लेबल नंबरला ‘जीईएसी’चा मान्यता क्रमांक व दिनांक अंकित नसतो. त्यामुळे विक्रेत्यांद्वारा याची पावती दिली जात नाही व हा फसवणुकीचा प्रकार ठरत आहे. पाकिटातील बियाण्यांची कोणतीच खात्री राहात नसल्याचे वास्तव आहे.

