महाराष्ट्र

आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत अंजनगावच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण झेप

आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचा अभिमानास्पद विजय

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :  अमरावती येथे आयोजित आंतरविद्यापीठस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठासाठी सुवर्णपदकांची कमाई केली असून या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावती येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत विद्यापीठाच्या संघात महाविद्यालयातील ओम सोळंके, दिपेश वानखडे, कु. साक्षी वानखडे, कु. अर्पिता गायगोले आणि कु. नितु नेमाडे या विद्यार्थ्यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. संघाचे व्यवस्थापक म्हणून डॉ. समीर बिजवे (संचालक, शारीरिक शिक्षण विभाग) यांनी प्रभावी नेतृत्व करत खेळाडूंना प्रेरणा व मार्गदर्शन दिले.
या ऐतिहासिक यशानिमित्त महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कविता मालोकार होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नितीन गोमाशे (अधिक्षक), प्रा. डॉ. सत्येंद्र गडपायले, डॉ. सुवर्णा झिलपे आणि श्री. प्रशांत नांदुरकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि संघ व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. समीर बिजवे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, खेळातील यश केवळ पदकापुरते मर्यादित नसून ते भविष्यातील करिअरच्या संधींसाठीही महत्त्वाचे ठरते. त्यांनी विद्यार्थ्यांना आगामी राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय स्पर्धांसाठी अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कविता मालोकार यांनी पाच सुवर्णपदके मिळवणे हा महाविद्यालयाच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे सांगत इतर विद्यार्थ्यांनीही या यशातून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेंद्र गिरी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नविता मालाणी यांनी केले. या प्रसंगी प्रा. भारती कोरडे, प्रा. आशा बाणाईत, डॉ. नितीन सराफ, डॉ. सतिश मार्डीकर, डॉ. राजेंद्र मानकर, डॉ. अनिकेत भुयार तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.