अमरावती हादरलं! पीएसआयची निर्घृण हत्या, आधी दुचाकीला कारने उडवलं अन् मग…

अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पोलिस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टू व्हिलरला आधी फोर व्हिलरने धडक दिली. नंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले.
हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या हत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिस अधिकाऱ्याची हत्या होत असेल तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल केला जात आहे.
अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते अमरावती पोलिस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते दुचाकीवरुन जात असताना एका फोर व्हिलरने धडक दिली. खाली पडताच पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार केले आणि फरार झाले.
या हल्ल्यामध्ये कलाम हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आले आहेत.
पोलिसांवरील हल्ल्यामुळे शहर हे सुरक्षित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येने शहरात खळबळ माजली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे.

