तीन कॅफेंवर पोलिसांचा धडक तपास; लैंगिक शोषण प्रकरणात नवे धागेदोरे उलगडत
अमरावती-अचलपूर-परतवाडा परिसर हादरला; अधिकाऱ्यासह दोघे निलंबित, १० जण ताब्यात

परतवाडा : शहरात उघडकीस आलेल्या संवेदनशील लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असून, पोलिसांनी विविध ठिकाणी समांतर छापे टाकत तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. या कारवाईदरम्यान अमरावती, अचलपूर आणि परतवाडा येथील तीन वेगवेगळ्या कॅफेंमध्ये पंचनामे करण्यात आले असून, प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येत आहेत.
तपासादरम्यान मुख्य संशयिताने शहरातील कठोरा रोड परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटचा वापर केल्याचे उघड झाले आहे. संबंधित ठिकाणी पोलिसांनी सखोल झडती घेत पंचनामा केला असून, फ्लॅट मालकालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या फ्लॅटमध्ये नेमके काय घडत होते, याचा तपास पोलीस यंत्रणा बारकाईने करत आहे.
दरम्यान, पीडित मुलींना विविध ठिकाणी बोलावून भेट घेतल्याची माहिती पुढे येताच अमरावतीतील ‘कॅफे रॉयल १०’, अचलपूरमधील ‘कॅफे फ्रेंड्स टाउन’ आणि परतवाड्यातील ‘कॅफे सोशल जंक्शन’ (सध्या बंद) या ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली. या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही तसेच इतर पुरावे तपासासाठी जप्त करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तपासाचा आवाका केवळ शहरापुरता मर्यादित न राहता परिसरातील इतर ठिकाणीही वाढवण्यात आला आहे. वझ्झर धरण परिसरातही संशयित हालचालींचा मागोवा घेत तपास करण्यात आला. या प्रकरणाशी संबंधित एकूण १० जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली जात आहे. अद्याप कोणतीही औपचारिक अटक करण्यात आलेली नसली तरी पुढील कारवाईबाबत पोलीस अत्यंत सतर्क आहेत.
सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने या प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तब्बल ४१ सोशल मीडिया खात्यांवर कारवाई करण्यात आली असून, ती खाती हटवण्यात आली आहेत. यामुळे डिजिटल माध्यमातून होणारा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आहे.
पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून महिला अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तपासाचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, तपासादरम्यानच सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. संबंधित व्हिडिओत काही पोलिस कर्मचारी संशयितासोबत वाढदिवस साजरा करताना दिसत असल्याचा आरोप झाल्याने, तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असून, प्रत्येक बाब कायद्याच्या चौकटीत राहून तपासली जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

