दापोरीत विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने शेळी दगावली

तिवसा : तालुक्यातील दापोरी शेतशिवारात सतीश वावरे यांच्या शेळीला तुटून पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीचा स्पर्श होताच गर्भवती शेळीचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सतीश वावरे यांच्याकडे स्वमालकीच्या १५ शेळ्या आहेत. रविवारी नेहमीप्रमाणे ते शेळ्या चारत असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तेव्हा घाईघाईने घराची वाट धरली. मार्गात लोंबकळणारी विद्युत वाहिनी कोसळून जमिनीवर पडली होती. शेळीचा त्याला स्पर्श होताच ती जागीच मृत्युमुखी पडली. शेळीपालकाने महावितरण कंपनीकडे रीतसर तक्रार करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
नुकसानग्रस्त शेळीपालकाचा अर्ज प्राप्त झाला आहे. आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा अर्ज नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार आहे.
नितीन उईके, उपविभागीय अभियंता, तिवसा

