ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

धामणगाव नगरपरिषद शाळांतील ज्ञानार्जन आसनपट्टीवरच

असुविधा 'बोलू' लागल्या : डॉ. हेडगेवार शाळा एक वर्षापासून बंद

धामणगाव रेल्वे : एकीकडे स्मार्ट क्लासरूम, व्हर्चुअल क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाचे युग सुरू झाले आहे. दुसरीकडे नगरपरिषदेच्या शाळेतील प्राथमिक विभागातील चिमुकले विद्यार्थी आसनपट्टीवर बसून ज्ञानर्जन करीत असल्याची धक्कादायक अन् विदारक चित्र शहरात दृष्टीस पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिथे विद्यार्थ्यांना बसायला डेस्क-बेंच नाही, तिथे व्हर्च्यूल क्लासरूमची अपेक्षा करणेच चुकीचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेच्या विद्यार्थ्यांना बसण्यास बेंच नसल्याने जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. येथील नगरपरिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वागणूक मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे. नगरपरिषदेतील शाळांतील विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविणे आवश्यक आहे. तथापि, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची प्रशासन काय दखल घेणार, असा सवाल पालक करीत आहेत.

 

नगरपरिषदेची एक शाळा बंद नगर परिषदेद्वारा संचालित डॉ. हेडगेवार शाळा पटसंख्येअभावी एक वर्षापासून बंद पडली आहे. शाळा बंद होण्यामागील खरी कारणे शोधण्यासाठी शिक्षण विभागाने सखोल चौकशी करण्याऐवजी कमी पटसंख्येलाच कारणीभूत ठरवले. शून्य पटसंख्या झालेल्या शाळांना टिकविण्यासाठी कोणतेही ठोस उपाय योजले जात नसल्याची टीका होत आहे, उलट अशा शाळांना थेट बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे शिक्षणाचा अधिकार आणि मुलांच्या शिक्षणाच्या संधी यावर परिणाम होत आहे. शिक्षण विभागाने पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. नगरपरिषदेतील शाळेकडे पालकांचा कल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

नगरपरिषदेच्या शाळांपर्यंत पोहोचलेल्या नाही योजना नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पातील शैक्षणिक सुविधांसाठी मंजूर होणाऱ्या खर्चाचे आकडे दिवसागणित वाढत असताना या योजना नगरपरिषदेच्या शाळांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. प्राथमिक सुविधांसाठी झगडणाऱ्या शाळांना ज्ञानरचनावाद, कृतियुक्त शिक्षण यांसारख्या अवघड योजनांची ओळख पटेपर्यंत नेमक्या किती पिढ्यांचे शिक्षण पूर्ण होईल, यांचे उत्तर अद्याप सापडलेले नाही.

 

नगरपरिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना डेस्क-बेंचवर बसता यावे, याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

उमेश गोंडिक, शिक्षण प्रशासन अधिकारी, नगर परिषद, धामणगाव रेल्वे

 

ज्या शाळेत विद्यार्थ्यांना बसायला डेस्क-बेंच नाही, त्या शाळांना डेस्क-बेंच उपलब्ध करून द्यावे.

नरेंद्र चौधरी, केंद्रीय अध्यक्ष नगरपरिषद शिक्षक संघ.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.