टेक्नॉलजीताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

नागपुरात उभारणार 8 हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार, 2 हजार जणांना रोजगार मिळणार

नागपुरात हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला.

नागपूर – नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि राज्य सरकारच्या उद्योग विभाग यांच्यात शुक्रवारी (13 जून) सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळं आता नागपुरातील संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सह्याद्री अतिथिगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून, त्याचे प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होणार आहे. प्रकल्पात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे जवळपास 2 हजार लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पात 8 वर्षांमध्ये सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

‘मेक इन इंडिया’ला चालना – हा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचं कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला हा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचं महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र (सेन्टर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यानं विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येणार आहे. यामुळे भारताच्या वाढत्या एरोस्पेस पुरवठा साखळीतही योगदान मिळणार आहे.

 

नागपूरची निवड केल्यानं आनंद – मॅक्स एरोस्पेसनं हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र आणि विशेषतः नागपूरची निवड केल्यानं आनंदी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. “मॅक्स एरोस्पेस व्यवसायाच्या प्रवासात राज्य शासनही सहभागी आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपुरात चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाणार आहे. कंपनीनं आपलं उत्पादनाचं काम ठरलेल्या वेळेत सुरू करावं”, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सोबतच नागपूरमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी परिपूर्ण परिसंस्था असून, उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य शासनानं उपलब्ध करून दिल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.