आरोग्यताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मंकी पॉक्सचा महाराष्ट्रात शिरकाव; धुळ्यात पहिला रुग्ण सापडला

मंकी पॉक्सची लागण झालेला व्यक्ती सौदी अरेबियातून धुळ्यात आला असल्याची माहिती आहे. 44 वर्षीय रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी आपल्या मुलीच्या लग्नासाठी धुळ्यात आला.

कोल्हापूर : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सनं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला आहे. धुळे जिल्ह्यातील गरीब नवाज नगर येथील 44 वर्षीय व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याची पुष्टी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) या प्रयोगशाळेनं केली आहे.

रुग्णावर धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, राज्य सरकार या प्रकरणात पूर्णपणे सतर्क असून, आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

 

सौदी अरेबियातून आलेल्या व्यक्तीस मंकी पॉक्सची लागण : मंकी पॉक्सची लागण झालेला व्यक्ती सौदी अरेबियातून धुळ्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. 44 वर्षीय रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी आपल्या मुलीच्या लग्नासाठी सौदी अरेबियातून धुळ्यात आला होता. धुळ्यात आल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या त्वचेवर पुरळ उमटू लागली व अंगदुखी सुरू झाली. या लक्षणांमुळे ३ ऑक्टोबर रोजी त्यानं हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी धाव घेतली. प्राथमिक तपासणीत मंकी पॉक्सची शक्यता दिसून आल्यानं त्याचे रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीसाठी पाठवलेले दोन्ही नमुने पॉझिटिव्ह आल्यानं रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून स्वतंत्र विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं.

आरोग्य मंत्र्यांनी काय सांगितलं? : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, “राज्यात आढळलेल्या मंकी पॉक्स रुग्णाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य यंत्रणा संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली असून आवश्यक सर्व वैद्यकीय व प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांनी रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचा शोध घ्यावा, रोग प्रतिबंधक उपाय तत्काळ राबवावेत आणि नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.”

मंकी पॉक्सचा रुग्ण ‘क्लेड-1’ प्रकारानं बाधित : धुळ्यात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण ‘क्लेड-1’ या दुर्मिळ आणि तुलनेनं अधिक संसर्गजन्य प्रकाराने बाधित असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV), पुणे यांनी स्पष्ट केलं आहे. ‘क्लेड-1’ हा प्रकार जगात कमी प्रमाणात आढळतो, मात्र तो इतर प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य मानला जातो. दरम्यान, राज्य आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्वचेवर पुरळ, ताप, सूज, अंगदुखी किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसून आल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, आणि स्वतःहून उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.