महाराष्ट्र

गणेशनगरात चिमुकल्यांचा रंगोत्सव; हास्य, जल्लोष आणि निरागस आनंदाने रंगली रंगपंचमी

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : गणेशनगर परिसरात यंदाची रंगपंचमी चिमुकल्यांनी उत्साहाने आणि निरागस आनंदाने अक्षरशः फुलून गेली. सकाळच्या कोवळ्या उन्हातच परिसरातील चिमुकल्यांनी एकत्र येत रंगांची उधळण केली आणि साऱ्या वातावरणाला सणाच्या जल्लोषाने भारून टाकले. ढोल-ताशांच्या गजरात, “होळी है!”च्या आनंदी आरोळ्यांमध्ये आणि रंगीबेरंगी अबीर-गुलालाच्या सरींमध्ये गणेशनगर दुमदुमून गेला.

या उत्सवात ओम मोंडोकार, अर्णव चौखंडे, आदित्य मेमनकर, सोहम कान्हेरकर, अर्णव तळोकार, शौर्य चौखंडे, श्रीरंग वाघमारे आणि देवांश कान्हेरकर या चिमुकल्यांनी विशेष उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रंगांचे थर असले तरी डोळ्यांतील आनंद आणि ओठांवरील हास्य मात्र स्पष्ट झळकत होते. एकमेकांना रंग लावताना मैत्रीचे बंध अधिक घट्ट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी परिसरातील ज्येष्ठांनीही चिमुकल्यांना सुरक्षित आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले. पाण्याचा अपव्यय टाळत कोरड्या रंगांनी सण साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. काही ठिकाणी फुगे आणि पिचकारींची धमाल सुरू असतानाच, तर काही ठिकाणी गाण्यांच्या तालावर चिमुकल्यांची नाचगाणी रंगली होती.
विशेष म्हणजे, सणाच्या निमित्ताने पालकांनीही आपल्या मुलांच्या आनंदात सामील होत त्यांच्यासोबत क्षण टिपले. मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेले हे रंगीबेरंगी क्षण सोशल मीडियावरही झळकताना दिसले. परिसरात ठिकठिकाणी गोडधोड पदार्थांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे सणाची गोडी अधिकच वाढली.

गणेशनगरातील या रंगपंचमी उत्सवाने समाजातील ऐक्य, मैत्री आणि बंधुभावाचा सुंदर संदेश दिला. निरागस हास्य, उत्स्फूर्त जल्लोष आणि रंगांची उधळण यामुळे यंदाची रंगपंचमी गणेशनगरवासीयांसाठी अविस्मरणीय ठरली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.