महाराष्ट्र

स्त्रीजीवनाच्या वेदनांना शब्द देणारी कादंबरी : वर्षा पतके थोटे यांच्या ‘चूक कोणाची?’चा समाजमनाला विचार करणारा वेध”

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती  : मराठी साहित्यविश्वात संवेदनशील आणि सामाजिक आशय असलेल्या साहित्यकृतींना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. त्या परंपरेत नव्याने भर घालणारी आणि स्त्रीच्या जगण्यातील वेदना, संघर्ष व प्रश्नांना भिडणारी कादंबरी म्हणजे लेखिका वर्षा पतके थोटे यांची “चूक कोणाची?” ही कादंबरी होय. विशेष म्हणजे ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी तिच्या लेखनात कुठेही नवखेपणाची छटा जाणवत नाही. उलट एखाद्या अनुभवी आणि परिपक्व लेखिकेप्रमाणे त्यांनी कथानकाची मांडणी, पात्रांची उभारणी आणि भावविश्वाचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे केले आहे.
“चूक कोणाची?” हा केवळ शीर्षकापुरता प्रश्न नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थेला आरसा दाखवणारा विचार आहे. हा प्रश्न नेमका कोणाला उद्देशून आहे — समाजाला, रूढीपरंपरांच्या बंधनात अडकलेल्या कुटुंबव्यवस्थेला की स्त्रीला स्वतःलाच? या तिन्ही घटकांमधील गुंतागुंत उलगडत कादंबरी वाचकाला विचार करायला भाग पाडते.

कादंबरीतील नायिका श्यामला हिच्या आयुष्याची झालेली फरफट पाहताना या तिन्ही स्तरांवरील वास्तव समोर येते.
या कादंबरीची पार्श्वभूमी डिजिटल युगाच्या आधीची असली तरी त्यातील प्रश्न आजही तेवढेच जिवंत वाटतात. काळ बदलला, तंत्रज्ञान प्रगत झाले, पण स्त्रीच्या जीवनातील अनेक संघर्ष अद्यापही तशाच स्वरूपात टिकून आहेत, हा कटू सत्याचा प्रत्यय कादंबरी देत राहते. मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक ह. ना. आपटे यांच्या “पण लक्षात कोण घेतो?” या कादंबरीतील नायिकेची वेदना जशी पुरुषसत्ताक समाजाच्या दडपणाखाली उमटते, तशीच वेदना वर्षा पतके थोटे यांच्या कादंबरीतील श्यामलाच्या आयुष्यातही दिसून येते.

स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आजही समाजासमोर उभा आहे. काही प्रमाणात स्त्रीला शिक्षण, नोकरी आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या बदलांचा लाभ मर्यादित समाजघटकांपर्यंतच पोहोचल्याचे वास्तव आहे. फ्रेंच विचारवंत व लेखिका मादाम सिमॉन बोव्हारी यांनी मांडलेली “स्त्री ही नेहमीच सेकंड सेक्स राहिली आहे” ही संकल्पना या कादंबरीच्या आशयाशी जवळून जुळून येते. समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजलेल्या स्त्रीद्वेषी विचारांमुळे तिच्यावर होणारे मानसिक आणि शारीरिक अत्याचार आजही पूर्णपणे थांबलेले नाहीत.

कादंबरीचे कथानक वैदर्भीय ग्रामीण वातावरणात उलगडते. त्या प्रदेशातील बोलीभाषेचा गोडवा आणि वास्तवतेची छटा संवादांमध्ये प्रभावीपणे जाणवते. त्यामुळे कथानक अधिक जिवंत वाटते. श्यामला ही अत्यंत देखणी तरुणी; पण तिचे हे सौंदर्यच तिच्या आयुष्यासाठी शाप ठरते. तिच्या प्रेमाची चाहूल लागताच तिचे आई-वडील घाईघाईने तिचे लग्न लावून देतात. त्या क्षणी पालक मोकळे होतात; मात्र श्यामलाचे आयुष्य एका नव्या संघर्षाच्या वळणावर येऊन उभे राहते.

तिचा नवरा संशयी आणि विक्षिप्त स्वभावाचा असल्याने तिच्या आयुष्यातील सुखाचे क्षण हळूहळू लुप्त होत जातात. बाळंतपणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या श्यामलाच्या तोंडून सासरी झालेले हाल ऐकून तिचे आई-वडील तिला पुन्हा सासरी पाठवू नये असा विचार करतात. मात्र नवऱ्याच्या मनधरणीने ते पुन्हा विरघळतात आणि तिला सासरी पाठवतात. इथेच कादंबरी वास्तववादी वळण घेते. श्यामलाने ठाम निर्णय घेतला असता तर कथानक वेगळ्या दिशेने जाऊ शकले असते; पण लेखिकेने वास्तवातील अनेक स्त्रियांचे आयुष्य जसे असते तसेच ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजातील अनेक स्त्रिया आजही सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळूनही नात्यांच्या आणि समाजमान्यतेच्या बंधनात अडकलेल्या असतात. “चुलीतले लाकूड चुलीतच जळले पाहिजे” या मानसिकतेमुळे त्यांना आयुष्यभर अनेक यातना सहन कराव्या लागतात. कादंबरीत हे वास्तव अत्यंत संवेदनशीलपणे मांडले गेले आहे.

लेखिका वर्षा पतके थोटे या आजच्या काळातील प्रभावी लेखिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. विश्रब्धसारखा ललितबंध, कथा, कविता आणि विविध साहित्यप्रकारांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनशैलीत ओघवतीपणा, भावनिक खोली आणि वास्तववादी दृष्टिकोन यांचा सुंदर संगम दिसून येतो.

या कादंबरीत पात्रांची उभारणी, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि मानवी भावभावनांचे सूक्ष्म चित्रण अत्यंत प्रभावी आहे. कथानक कुठेही रटाळ होत नाही; उलट प्रत्येक प्रसंग पुढे काय घडणार याची उत्सुकता निर्माण करतो. त्यामुळे वाचक कादंबरीत पूर्णपणे गुंतून जातो आणि शेवटपर्यंत तिच्या प्रवाहात वाहत राहतो.

कादंबरीतील एक प्रसंग विशेष लक्षवेधी आहे. लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या श्यामलाला तिची आई विचारते तेव्हा ती खाली मान घालून म्हणते –
“तुम्ही लोकांनी माझं प्रेम सफल होऊ दिलं नाही. निदान नवरा तरी चांगला पाहून द्यायचा.”
या दोन वाक्यांत तिच्या मनातील वेदना आणि अपूर्ण स्वप्नांची जाणीव ठळकपणे उमटते.
लेखिकेच्या कवितेतील काही ओळी या कादंबरीच्या आशयाला अधिक अधोरेखित करतात—
होताहेत हिरव्या स्वप्नांचे दफनविधी
एवढीच तर माफक इच्छा आहे
घेता यावा मोकळा श्वास
अन संपावे भयाचे भास…
ही इच्छा प्रत्येक स्त्रीच्या मनातील असते; मात्र ती पूर्ण होणे अनेकांच्या नशिबात नसते. श्यामलासारख्या अनेक स्त्रिया भयाच्या सावल्यांमध्ये जगत राहतात आणि त्याच सावल्या त्यांचे आयुष्य गिळून टाकतात.

एकूणच “चूक कोणाची?” ही कादंबरी स्त्रीजीवनातील वेदना, समाजरचनेतील विसंगती आणि मानवी नात्यांतील गुंतागुंत यांचा सखोल वेध घेणारी ठरते. वाचकाला विचार करायला लावणारी आणि मनाला भिडणारी ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात निश्चितच लक्षवेधी ठरेल.
लेखिका वर्षा पतके थोटे यांना या उल्लेखनीय साहित्यकृतीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
— ज्योती पुजारी
मो. 9765031435
कादंबरी : चूक कोणाची?
लेखिका : वर्षा पतके थोटे
प्रकाशन : मधुश्री प्रकाशन
किंमत : ५०० रुपये
पृष्ठसंख्या : २२८

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.