आरोग्यटेक्नॉलजीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भयाण वास्तव : रस्ता नसल्यानं गरोदर महिलेला झोळीतून नेलं रुग्णालयात

ठाणे जिल्ह्यातून एक अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. इथल्या एका गरोदर महिलेला रस्ता नसल्यानं झोळीतून रुग्णालयात घेऊन जावं लागलं आहे.

ठाणे : जिल्ह्यातून एक अतिशय संताप आणणारी बातमी समोर आली आहे. एका गरोदर महिलेला रस्ता नसल्यानं कपड्याच्या झोळीतून रुग्णालयात घेऊन जावं लागलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील आहे. मुंबईपासून केवळ 73 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील नडगाव गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही रस्ता नाही. त्यामुळे जंगल, रानावनातून चिखल तुडवत, नदी – नाले ओलांडत गावकऱ्यांना मुख्य रस्त्यावर यावं लागते. तर रुग्णांना दोन बांबूंना कपडा बांधून त्याची झोळी करुन त्यातून घेऊन जावं लागते. अनेकदा रुग्ण रस्त्यातच दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातच आता असंच एक विदारक चित्र पाहायला मिळालं आहे. 21 वर्षीय गरोदर महिलेला कपड्याच्या झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातील घटना : माजी मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ही घटना आहे. ठाणे जिल्ह्यातील नडगावात रस्ताच नसल्यानं पाड्याकडं कुणी फिरकत नाही. शाळेत जाणारी मुलं शाळा सुरू असताना पावसाळ्याचे 4 महिने शिक्षणापासून वंचित राहतात. परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जातात. शहापूर तालुक्यातील या आदिवासी वाडीला रस्ता मिळेल, असं गावकऱ्यांना वाटत होतं. मात्र या रस्त्याचं काम कागदावरच राहिलं आहे.

गावातील तरुणांनी झोळीतून रुग्णालयापर्यंत पोहोचवलं : दरम्यान, या घटनेबाबत श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी प्रकाश खोडका यांनी सांगितलं की, “सोमवारी (23 जून) दुपारच्या दीड वाजताच्या सुमारास नडगावातील महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. यानंतर वाडीतील 4 तरुण या महिलेच्या मदतीला आले. त्यांनी बांबूला चादर बांधून झोळी तयार केली आणि महिलेला एक किलोमीटरपर्यंत झोळीत नेलं. एक किमी अंतरावर असलेल्या चाफ्याची वाडी या गावात सरकारी रुग्णवाहिका थांबली होती. रुग्णवाहिकेतून महिलेला शहापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण महिलेला आकडी आल्यानं पुढील उपचारासाठी ठाणे इथल्या शासकीय रुग्णलाय घेऊन जावं लागलं.”

 

अश्मयुगात आल्यासारखंच वाटते, तरुणांनी व्यक्त केल्या वेदना : नडगावात रस्ता नसल्यानं वाहन जात नाही. त्यातच आजच्या यंत्र युगातही आजारी रुग्णांना झोळीतून रुग्णालयात नेलं जात आहे. दररोज असं चित्र पाहावं लागत असल्यानं अश्म युगात आल्यासारखंच वाटते, अशी भावना इथल्या तरुणांनी व्यक्त केली. या गावाला वर्षोनुवर्षे रस्ता, पाणी या समस्या भेडसावत आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याचे मुख्यालय असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गाव-पाड्यात आदिवासींच्या नशिबी आलेलं हे वेदनादायक जगणं व्यथित करणारं आहे.

रस्त्याचा प्रश्न सोडवणार – तहसीलदार: या गंभीर विषयाकडे ईटीव्ही भारतने शहापूरचे तहसीलदार परमेश्वर काळुसे यांचं लक्ष वेधलं असता काळुसे म्हणाले,”मुख्य रस्त्यापासून चाफ्याची वाडीचे अंतर 1 किलोमीटर खाजगी शेती असल्याने जागा मिळत नाही.” सध्या वापरात असलेला रस्ता चाफ्याचीवाडी डोंगरीवाडी 2 किमी असून लवकरच या गावातील रस्त्याचा प्रश्न प्रशासनाकडून सोडण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.