मेळघाट येथे नवजात बालिकेच्या पोटावर ३९ चटके; पोटफुगीवर मेळघाटात अघोरी उपचार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) धारणी : पोटफुगीच्या विकार झालेल्या नवजात बालिकेवर वृद्ध महिलेने आघोरी उपचार केले. गरम विळ्याने तिच्या पोटावर ३९ चटके दिले. हा प्रकार घटने नंतर ७ दिवसांनी समोर आला. रिचमू धोंडू सेलूकर (२५, रा. दहेन्द्री) असे या बालिकेच्या आईचे नाव असून तिनेच पोलिसांत तक्रार दिली आहे.
रिचमू हिने १५ जून रोजी मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृतीही उत्तम होती. पण दहा दिवसांनी मुलीला सर्दी झाली. तिचे पोटही फुगले. त्यावेळी परिचारिका घरी आली व तिने औषधोपचार केला. काही औषधेही दिली होती. २५ जूनला गावातीलच एक परिचित महिला रिचमू सेलूकरच्या घरी आली. तिने या बाळाला पाहिले आणि सांगितले की, तिचे पोट फुगले आहे, नाकातून पाणी वाहत आहे. बाळाला डंबा (चटके) दिला तर तब्येत ठणठणीत होईल, असे सांगत काही वेळातच तिने विळ्याने बाळाच्या पोटावर चटके दिले. दरम्यान ४ जुलैला परिचारिका बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी पुन्हा घरी आली असता तिला बाळाच्या पोटावर चटक्यांचे व्रण दिसले. तिने बाळाला तातडीने काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अचलपूरच्या स्त्री रुग्णालयात दाखल केले. बाळावर उपचार करून ५ जुलैला रुग्णालयातून बाळाला सुटी देण्यात आली आहे. बाळाची प्रकृती चांगली असल्याचे अचलपूर स्त्री रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विजय शिरसमकर तसेच उपचार करणारे बालरोग तज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकारणी चटके देणाऱ्या मनू मानू कासदेकर हिच्याविरुद्ध चिखलदरा पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
–चटके देणे अंधश्रद्धाच. विविध कारणांनी लहान बाळांचे पोट फुगते, पोट फुगल्यानंतर त्याच्या पोटावर चटके (डंबा) दिले की पोटफुगी बरी होते, असा ग्रामीण तथा आदिवासी समाजात अनेकांचा गैरसमज (अंधश्रद्धाही) आहे. चार महिन्यापूर्वीही चिखलदरा तालुक्यातीलच थिमोरी गावातील एका २२ दिवसाच्या बाळालासुध्दा अशाचप्रकारे डंबा देण्यात आला होता.

