अक्षर मानवचे आगळेवेगळे “माणूस संमेलन” “आम्ही भारतीय लोक” या विषयावर राज्य स्तरीय माणूस संमेलन होणार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : मानवी समाजाची सर्व व्यवस्था बदलली पाहिजे माणसं सरळ, नैतिक मार्गाने जगली पाहिजे. जात, धर्म, पंथ, या पलीकडे जाऊन केवळ ‘माणूस’ म्हणून सजगपणे प्रामाणिकपणे जगणे हीच अक्षर मानवची भुमिका आहे. या साठी अक्षर मानव राज्य भरात वेगवेगळे उपक्रम घेत राहते असेच वर्षातुन फक्त एकदा होणारे अक्षर मानवचे सम्मेलन म्हणजे “माणूस संमेलन” होय. हे संमेलन 25, 26, 27 जुलै 2025 रोजी हडशी, मावळ, जिल्हा पुणे येथे होईल. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या चाळीसगाव येथे झालेल्या मुख्य बैठकीत हे संमेलन ठरलं अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे अक्षर मानवचे राज्य कार्यवाह तथा विदर्भाचे पालकमंत्री श्री आझाद खान यांनी अमरावती मध्ये ही माहिती दिली.
‘अक्षर मानव’ संघटनेकडून दर वर्षी माणसांचं एक संमेलन भरवलं जातं. दर वर्षीच्या संमेलनाला एक विषय किंवा एक नाव दिलं जातं. किंवा असं म्हणूया की, माणसाच्या जगण्यातली एक संकल्पना दिली जाते, आणि त्या संकल्पनेच्या भोवती तीन दिवस गप्पा मारत, चर्चा करत, त्या संकल्पनेचा आनंददायी आणि तेवढाच गंभीर, जगण्याला उपयुक्त उलगडा करत हे संमेलन चालतं.
संमेलनाचा मुख्य उद्देश आहे, माणसाला माणूस जोडणं. व माणुसकीच्या मूल्यांचा प्रचार करणे त्यामुळं कसला भेदाभेद न करता, सर्व क्षेत्रांतली, राज्य भरातुन काणकोपऱ्यातिल, सर्व भागांमधली, सर्व गटातटांची माणसं इथं येतात. या संमेलनात सहभागी होणारी सर्वच्या सर्व माणसं एकत्र राहतात. आणि एकमेकांशी सतत बोलत एकमेकांना जाणून घेत असतात. या संमेलनात कोणत्याही वक्त्याचा सत्कार होत नाही , हार नहीं, तुरे नाही, स्वागत नाही, वेगळी वागणूक नाही, निव्वळ माणूस म्हणून त्याला किंमत दिल्या जाते. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथं बोलावं लागतं ही प्रमुख अट राहते.
माणसांनी एकमेकांना आस्थेनं समजून घेण्यासाठी, माणूस घडवण्यासाठी आणि माणसांमध्ये सर्व मतांच्या, भेदांच्या पल्याड जाऊन आत्मीयता निर्माण होण्यासाठी हे संमेलन आहे. दर वर्षी मानवी आयुष्यातला एक महत्वाचा विषय घेऊन त्यावर हे संमेलन होतं. या वर्षीचा विषय आहे ‘आम्ही भारताचे लोक’ देशातल्या माणसांच्या जगण्यावर आणि जगण्याच्या मुद्द्यांवर आपण सर्वांनीच बोलायचं आहे. भारतीय लोक म्हणून आपण घरापासून दारापर्यंत काय जगतो आहोत, काय जगायला पाहिजे, यावर बोलायचं आणि व्यक्त होणाऱ्या माणसाला ऐकायचं आहे. या माणूस संमेलनात सुप्रसिद्ध मराठी लेखक, कथा – कादंबरीकार अक्षर मानवचे विश्वस्त राजन खान तिन्ही दिवस आवर्जून उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अक्षर मानवचे महाराष्ट्राचे मुख्य पदाधिकारीं आझाद खान दिली.
रम्य ठिकाण, रम्य पाऊस, रम्य माणसं. उत्तम जेवण, चहा-नाश्ता. गाणीबजावणी, नृत्यसुद्धा. हास्यविनोद, गप्पा. आसपास फिरणं. लागलंसवरलं तर देखभाल करायला माणसंही असतात. सोबतीला निकोप, निरोगी पाऊसही असतो. महिलांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. या संमेलनात दारूला बंदी असते. वयाची अट नाही. सगळे कुटुंबीय मिळून येऊ शकतात. मुलांना सोबत आणता येतं आणि मनसोक्त बागडू दिलं जातं.
संमेलन शुक्रवारी ४ वाजता अचूक सुरू होईल. काही मान्यवर व्यक्तींची बीजभाषणं होतील. आणि रविवारी ४ वाजता संमेलन संपेल. त्याचं वेळापत्रक नाव नोंदणी केल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल. अशी माहिती अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हा सचिव सौ. अश्विनी वितोंडे यांनी माहिती दिली.
अमरावती वासियांनी या संमेलनात सहभागी होण्यासाठी आपले नाव लवकरात लवकर नोंदवावे नावनोंदणीची मुदत 15 जुलै 2025. आहे. नावनोदणी साठी संपर्क 9766096906 या मोबाईल क्रमांकावर आपले नाव नोंदवावे मुदती नंतर आपले नावं स्वीकारली जाणार नाहीत. जास्तीत जास्त नागरिकांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी व अमरावती अक्षर मानव जिल्हा कार्यकारिणीने नागरिकांना आवाहन केले आहे.

