क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

रायगडच्या कोरलाई समुद्रात दिसली संशयास्पद पाकिस्तानी बोट; पोलिसांकडून रात्री कोम्बिंग ऑपरेशन

मुरूड तालुक्यातील कोरलाई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट दिसून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

रायगड- मुरुड तालुक्यातील कोरलाई समुद्रात संशयास्पद बोट दिसल्यानंतर स्थानिक जनतेला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही संशयास्पद बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईवर २६/११ चा हल्ला केलेले पाकिस्तानी दहशतवादी हे समुद्रमार्गे बोटीमधून आले होते. त्या पार्श्वभूमीवर संशयित बोटीबाबत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

कोरलाई समुद्रात दिसून आलेल्या संशयास्पद बोटीतून काही व्यक्ती समुद्रात उतरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्याकरिता पोलिसांनी रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलिसांनी संशयित व्यक्तींना शोधण्याकरिता झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.

 

पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन- संशयित बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा पोलिसांना संशय असल्यानं पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक-नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या आहेत. कोरलाईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट दिसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या सर्व घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाकडूनदेखील अद्याप कोणतीही माहिती अथा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

जनतेला अलर्ट राहण्याचा इशारा- कोरलाई गावाचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सांगितलं, “रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी पाकिस्तानी बोट समुद्रात पोहोचल्याची माहिती दिली. आम्ही ग्रामस्थ तेथे जाईपर्यंत पोलीस पोहोचले होते. आम्ही दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत तिथे थांबलो. पण, पहाटे चार वाजल्यानंतर ती बोट दिसेनाशी झाली. त्यामुळे ही संशयास्पद बाब वाटली. त्यामुळे कोरलाई जनतेला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.”

३१ जुलैपर्यंत समुद्रात खोल मासेमारी करण्यावर बंदी- राज्यात खोल समुद्रातील मासेमारीवर १ जूनपासून दोन महिन्यांची म्हणजे ३१ जुलैपर्यंत बंदी आहे. असे असले तरी किनारी भागात विना यांत्रिक बोटीमधून पारंपरिक मासेमारी करण्यावर बंदी नाही. बंदी काळात मासेमारी केली तर बोटींवर कडक कारवाई करण्याचा राज्य सरकारनं इशारा दिला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.