ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

ऑफीसमध्ये बसून काय काम करता? अभियंत्याला जाब विचारत दोन तरुणांनी महावितरण कार्यालयातील टेबल दिलं पेटवून!

कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे (३८, अमरावती) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

अमरावती- दोन तरुणांनी महावितरणच्या खारतळेगाव उपकेंद्रात घुसून तेथील टेबल खुर्ची पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंत्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. तरुणांचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढल्यामुळं अभियंता बचावला. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे (३८, अमरावती) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन तरुणांनी आग लावल्यानं उपकेंद्रातील टेबल खुर्ची आणि त्यावरील शासकीय दस्तावेज जळून खाक झाला. आरोपींनी कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोडदेखील केली.

वीज पुरवठा खंडित होत असल्यानं संताप- गोपाल इंगळे हे रविवारी दुपारी महावितरणच्या खारतळेगाव वितरण केंद्रात आपले सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, यंत्र चालक गोपाल नेरकर आणि सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे यांच्यासह कर्तव्यावर होते. त्यावेळी गजाननधाम रेवसा येथील काही नागरिकांचे विद्युत पुरवठा सुरळीत राखण्याचं निवेदनदेखील इंगळे यांनी स्विकारले. तेवढ्यात वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनित तायडे हे उपकेंद्रात आले. त्यांच्या हातात चार प्लास्टिक बॉटल होत्या. “आमच्याकडे लाईट राहत नाही. तुम्ही ऑफीसमध्ये बसून काय काम करता? आम्ही तुमचं ऑफिस पेटवून देणार आहोत. तुम्हालासुद्धा पेटवून देणार आहोत,” अशी धमकी त्यांनी इंगळे यांना दिल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

पेट्रोल टाकून पेटविला टेबल – सरकारी कर्मचारी इंगळे आणि धाकडे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवीगाळ करत एकानं बॉटलमधील पेट्रोल उपकेंद्रातील टेबलवर आणि इतरत्र शिंपडले. तसेच अन्य टेबलवरील कागदपत्रांचीदेखील दोघांनी फेकफाक केली. एका कर्मचाऱ्यानं टेबलवरील दस्तावेज सुरक्षित ठिकाणी नेण्याचा तर इंगळे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. इंगळे हे मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडीओ घेत असताना विनीत तायडे यानं त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. विनितनं लगेच आगपेटीनं ऑफिसमधील टेबलला आग लावून दिली. ती सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली.

आरोपींचा शोध सुरू- पेट्रोल ओतताच अभियंत्यांनी काढला पळ – कार्यकारी अभियंता लांडे यांना घडलेली घटना पोलिसांना सांगितली. दोन्ही आरोपींनी त्यांच्या दुचाकीनं (एमएच २७ एबी ८५८) तेथून पळ काढला, असे इंगळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वलगावचे पोलीस निरीक्षक वैभव पानसरे यांनी दिली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.