नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग!
सकाळी दहा वाजल्यापासून 32 हजार 763 क्युसेक्सनं विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळं नीरा नदी काठच्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

बारामती : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसानं उसंत घेतली आहे. त्यामुळं गेल्या रविवारपासून (20 जुलै) वीर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, गुरुवारपासून (24 जुलै) पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळं नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शनिवारी दुपारपासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात 5 हजार 318 क्युसेक्सनं, तर रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून 14 हजार 496 क्युसेक्सनं विसर्ग सुरू करण्यात आला. आज सोमवारी सकाळी पाच वाजल्यापासून 23 हजार 735 क्युसेक्सनं आणि सकाळी दहा वाजल्यापासून 32 हजार 763 क्युसेक्सनं विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळं नीरा नदी काठच्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वीर धरणात 95.32 टक्के पाणीसाठा : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेले नीरा देवधर धरणात 86.54 टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून 5 हजार 130 क्युसेक्सनं विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात 95.88 टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून भाटघर धरणाच्या अस्वयंचलित द्वारांतून सांडव्याद्वारे 4 हजार क्युसेक्सनं तर विद्युत निर्मिती केंद्रातून 1 हजार 631 क्युसेक्सनं असा नीरा नदीपात्रात 5 हजार 631 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरणात 75.52 टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी सहा वाजल्यापासून 250 क्युसेक्सनं विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या तिन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात येत आहे. वीर धरणात 95.32 टक्के पाणीसाठा झाला असून, वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी दहा वाजल्यापासून 32763 क्युसेक्सनं विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सतर्कतेचा इशारा : नीरा नदीच्या दोन्ही काठावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी, असं आव्हान पाटबंधारे विभागानं केलं आहे. पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असं ही नीरा पाटबंधारे विभागानं स्पष्ट केलं आहे.

