स्टॅण्डच नाही; रिक्षा लावायची कुठे ?

अमरावती : दिवसेंदिवस शहराची – लोकसंख्या आणि व्याप वाढत असल्याने रस्त्यावरील वाहतूकही प्रचंड वाढली आहे. त्यातच रिक्षांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र शहराच्या वाढत्या गरजेनुसार नव्या रिक्षा स्टॅण्डची निर्मिती करण्यात अद्याप दुर्लक्ष होत आहे. परिणामी, रिक्षा चालकांना रस्त्यावरच वाहन उभे करावे लागत आहे. त्यामुळे अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पादचाऱ्यांनाही चालण्यासाठी अडचण निर्माण होते. शिवाय शाळा, बाजारपेठा, हॉस्पिटल आदी गर्दीच्या ठिकाणी रिक्षा थांबवण्यात येतात, ज्यामुळे आणखी गोंधळ वाढतो. रिक्षा व्यवस्थापनाचा अभाव शहर वाहतुकीसाठी गंभीर समस्या ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहराच्या गरजेनुसार नवे रिक्षा स्टॅण्ड विकसित करणे आवश्यक आहे, त्यानंतर गैरसोय टाळता येईल.
स्टॅण्ड नसलेल्या ठिकाणी उभे राहतात रिक्षा : शहरात रिक्षा स्टॅण्डच्या अभावामुळे अनेक ऑटोचालक प्रवासी दिसताच थेट चौकातच आपली रिक्षा वळवतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. राजकमल चौक, पंचवटी चौक, शेगाव नाका, कठोरा नाका, मध्यवर्ती बस स्टॅण्ड परिसरात रिक्षा चालक थेट सिग्नलच्या बाजूला आपली रिक्षा उभी करतात. परिणामी वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. काही वेळा अपघाताचीही शक्यता निर्माण होते.
रिक्षा चालकांच्या मागणीनुसार नव्याने ऑटो स्टॅण्ड निर्मिती करण्याबाबत महापालिकेसोबत चर्चा चालू आहे. ज्या ठिकाणी रस्त्याला अडचणी येणार नाही. त्या ठिकाणी त्या योजना करण्यात येईल. याशिवाय शहरातील सिग्नलबाबत देखील पाहणी करण्यात येत आहे.
– रमेश धुमाळ, पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा
सद्या शहरात असणारे ऑटो स्टॅण्ड हे कमी पडत आहे आम्ही नव्याने ११० ऑटो स्टॅण्ड ची मागणी केली आहे. दिवसेंदिवस ऑटोरीक्षांची संख्या वाढत आहे. शहरात आहे. ऑटो स्टॅण्ड कमी आहे. आमचे ऑटो रस्त्यावर उभे असले की वाहतूक पोलीस चालान करतात. मनपा स्टॅण्ड तयार करावी
नितीन मोहोड, अध्यक्ष ऑटो चालक संघटना

