ताशा तर्राररला, ढोलही वाजला! गणरायाच्या आगमनासाठी ढोल पथकांच्या जुगलबंदीत तरुणाई दंग, आतुरता बाप्पाची
लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन 27 ऑगस्ट रोजी (Ganesh Chaturthi) होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणेशाचं स्वागत करण्यासाठी सर्व आतुर झाले आहेत.
मुंबई : सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती आगमन मिरवणुकीला (Ganesh Chaturthi) सुरुवात होत असताना, गर्दीमध्ये होत असलेल्या गोंधळामध्ये अचानक टणटण टणटण अशी घंटा वाजू लागते. सर्वत्र शांतता पसरते आणि शिवगर्जना किंवा ‘बोल बजरंग बली की जय’ची आरोळी उठली की ढोलचा आवाज घुमू लागतो. एका लयीत सगळी वाद्य वाजायला सुरुवात होते आणि वाद्यांच्या जल्लोषात गणपती बाप्पाची मिरवणूक मार्गी लागते. सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या येण्याचा उत्साह संचारला आहे. त्यासाठी तरुणाई आपल्या पद्धतीने या उत्साहात भर घालत पारंपरिक वाद्यांच्या तालात दंग झालेली दिसत आहे.
गणेशाला मानवंदना देण्यासाठी ढोल ताशा पथक सज्ज : एकीकडं डीजे आणि स्पीकरच्या तालावर नाचणारे तरुण आणि त्यामध्ये लेझर लाईटचा होत असलेला धोकादायक वापर. यामुळं वृद्ध, आजारी नागरिक आणि लहानग्यांची झोप उडते. स्पीकर आणि डीजेच्या कर्कश्य आणि प्रमाणापेक्षा जास्त आवाजामुळं लहानग्यांच्या कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर मागच्यावर्षी लेझर लाईटमुळं अनेकांची दृष्टी गेल्याचं समोर आलं होतं. म्हणूनच या सगळ्या बेशिस्तीत ढोल ताशा पथकांचे पारंपरिक वाद्य वंदन नेहमीच कौतुकाचा विषय ठरत आलेला आहे. तरुणाई आपल्या संस्कृतीच्या जवळ जात जुनी वाद्य शिकत आहेत हे चित्र आशादायक आहे. मुंबईमध्ये अनेक ढोल ताशा पथके गणपतीमध्ये पारंपरिक वाद्यं वाजवत गणेशाला मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत.
गिरगाव ध्वजपथक : मुंबईमधलं आमचं पहिलं ढोल पथक आहे असं या ढोल पथकाचा सदस्य इंजिनियर असलेला निखिल सांगतो. २००५ मध्ये १६ जणांच्या सहभागाबरोबर राजेश साळगावकर आणि अनिल गाडगीळ या दोघांच्या संकल्पनेतून गिरगाव ध्वजपथकाची स्थापना झाली. या पथकाचं नाव लोकेशन बेस वाटतंय कारण गिरगावात जी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्षानिमित्त शोभायात्रा असते त्यामध्ये आमचं पथक २००५ मध्ये ध्वज घेऊन सहभागी झालं होतं. तेव्हा या पथकाला पेपरमधून ‘गिरगावचं ध्वज पथक’ असं संबोधण्यात आलं आणि तेव्हापासून हे नाव गिरगाव ध्वजपथक पडलं. आमच्या ध्वजपथकामध्ये ५०० हुन जास्त सदस्य आहेत. गणपतीमध्ये २०० सदस्य पथकाची धुरा सांभाळतात. आम्ही जास्तीत जास्त ४ ते ५ ठिकाणच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतो. यंदा ढोल ताशासोबतच संबळ या वाद्य प्रकारा चा आम्ही समावेश केला आहे.
ढोल ताशाची जुगल बंदी : ज्या विजय चव्हाण यांनी नटरंग सिनेमामध्ये ढोलकी वाजवली होती त्यांनी आम्हाला संबळ वाजवायला शिकवलं आहे. यंदा आम्ही १० संबळ वादक ढोल वादकांबरोअबर जुगबंदी करत आहोत. आमच्या पथकामध्ये ५० टक्के महिला आणि मुलींची संख्या आहे. ढोल ताशा वाजवायला, ध्वज नाचवायला मुली आणि महिला उत्साहाने आणि ताकदीने पथकात सहभागी होतात. सगळ्याच महिला आपलं शिक्षण, करियर आणि घर सांभाळत दर शनिवार रविवार सरावासाठी येत असतात आणि त्या पथकामध्ये अग्रेसर आहेत. पथकामध्यले सगळेच सदस्य आपापला व्यवसाय, नोकरी सांभाळत पथकामध्ये सहभागी होतात. त्यामुळं यंदा संबळ आणि ढोल ताशाची जुगल बंदी घेऊन गिरगाव ध्वजपथक गणरायाच्या स्वतःसाठी सज्ज आहे.
कुर्ल्याचं महाराजा ढोलपथक : कुर्ल्याच्या पत्रा चाळीमधल्या तरुण तरुणींनी २०१५ मध्ये ‘महाराजा ढोल पथका’ची स्थापना केली. इथली सगळीच मुलं मुली जॉब आणि अभ्यास सांभाळत ढोल ताशा पथकांमध्ये सहभागी होत असल्याचं पथकाची सदस्य आरती सांगते. पुण्यातील अनेक ढोल ताशा पथकांबद्दल क्रेझ होती. मलाही ढोल पथकात सामील व्हायचं होतं. माझ्या घराजवळ महाराज ढोल ताशा पथक असल्यानं मला तिथे सहभागी व्हायची संधी मिळाली आणि जवळ असल्यानं घरच्यांची परवानगी सुद्धा मिळाली. आज 10 वर्ष झाली पथकामध्ये मी ढोल वाजवते. हे आता माझं कुटुंब झालं आहे. सुरुवातीला कॉलेजला असताना सहभागी झाली आता जॉब सांभाळत घरातील काम आवरून मी माझी आवड जोपासत असल्याचं आरती सांगते. पथकातील सर्वच सदस्य एकमेकांना कुटुंबासारखं जपत असल्याचा अभिमान आहे, असं आरती महाराजा ढोल पथकाचं वैशिष्ट्य सांगताना म्हणते.
शिवसूत्र ढोल ताशा पथक, भांडुप : आमच्या ढोल पथकामध्ये महिलांचे ध्वज पथक, लेझीम पथक, महिला दांडपट्टा, लेझीम ते महिला ध्वज नाचण्याची जबाबदारी घेत सहभागी होतात, असं शिवसूत्र ढोल ताशा पथकाचा सदस्य दीपक यांनी सांगितलं. १४ वर्षापासून शोभायात्रेत आणि गणरायाच्या मिरवणुकीत आमचं ढोल ताशा पथक उत्साहात सादरीकरण करत असल्याचं दीपक अभिमानाने सांगतो. गणपतीनिमित्त आम्ही २ महिने आधीपासून सरावाला सुरुवात करतो. पथकातील सगळेच नोकरी व्यवसाय करत आहोत. त्यामुळं संध्याकाळच्यावेळी २ ते ३ तास सर्व करतो असं दीपक याने सांगितलं. आमच्या पथकात ६० सदस्य असून यात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, महिला, तरुण आणि तरुणी समावेश आहे. सर्वजण आप आपलं काम सांभाळत या छंदाला वेळ देतात. यावर्षी आम्ही मुलुंड, भांडुप आणि घाटकोपरमधील गणपतीच्या मिरवणुकीत सादरीकरण करणार आहोत, अशी माहिती दिपकने दिली.

