अजित पवारांनी मुख्यमंत्री होऊन विठूरायाची शासकीय पूजा करावी, माजी मुख्यमंत्र्याला हरवलेल्या आमदाराचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री होऊन विठूरायाची शासकीय पूजा करावी, असं साकडं देवाला घातलं आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांना पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळावा, असं साकडं आपण पांडुरंगाला घातल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलं आहे. चिखलीकरांच्या या अपेक्षेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आमदार चिखलीकरांनी पंढरपूरला जाऊन विठूरायाचं दर्शन घेतलं, यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे.
चिखलीकर नेमकं काय म्हणाले? : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. “महायुती सरकारला भक्कम पाठिंबा आहे. सर्वाधिक जागा भाजपाच्या आहेत व सर्वांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पण सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रमोशन झालं, त्यांना केंद्रात मोठं पद मिळालं, तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री होऊन पांडुरंगाची शासकीय पूजा करावी,” अशी अपेक्षा चिखलीकरांनी व्यक्त केली.
अमोल मिटकरींचीही अशीच अपेक्षा : दरम्यान, काही दिवसांपूर्वीच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री होऊन पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीची शासकीय पूजा करावी, असं वक्तव्य केलं होतं. हाच धागा पकडत पत्रकारांनी चिखलीकरांनी प्रश्न विचारला, यावर त्यांनी हे उत्तर दिलं. तसेच, “मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी 19 वर्षांपासून वारीत जातो. राज्यातला शेतकरी कष्टकरी सुखी समृद्ध व्हावा, अशी प्रार्थन केल्याचंही चिखलीकरांनी सांगितलं.
चिखलीकर यांची कारकीर्द :- प्रतापराव पाटील चिखलीकर यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1989 साली सरपंच पदापासून झाली. यानंतर आता आमदार, खासदार आणि आता पुन्हा आमदार असा प्रवास सुरू आहे. चिखलीकर हे 1989 ते 1992 पर्यंत चिखली गावचे सरपंच होते. त्यानंतर 1992 ते 2004 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य राहिले. सभापती, उपसभापती पदावर काम केलं. 2004 मध्ये त्यांनी लोहा कंधार मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा केला होता पराभव : पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकेकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक, अशी चिखलीकरांची ओळख होती. पण नंतरच्या काळात प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण असा संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणात झाला. तो आजही सुरू आहे. आता दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सोडली असून अशोक चव्हाण हे भाजपात तर चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांनी भाजपाच्या तिकिटावर अशोक चव्हाणांचा पराभव केला होता.

