उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; शिवसेना-मनसे युतीची घोषणा होणार?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये प्रदीर्घकाळ चर्चा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल केव्हाही वाजू शकतं, अशी परिस्थिती आहे. प्रशासन निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामात व्यस्त असताना आता नेते मंडळी देखील मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत. आज (10 सप्टेंबर) मुंबई, ठाणे येथे प्रभाग रचनांवरील हरकतीवरून प्रशासकीय सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये प्रदीर्घकाळ चर्चा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या दोन्ही भावंडांची ही राजकीय भेट असल्याचं सध्या म्हटलं जात असून, या भेटीतून नेमकं काय समोर येतं? त्या दोन भावांच्या चर्चेमध्ये नेमकं काय ठरतं? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून सध्या महाविकास आघाडीत देखील हालचाली पाहायला मिळत आहेत. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत भूमिका जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसंच आता या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ गाठून पुढील चर्चा सुरू केल्याचं म्हटलं जात आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत व आमदार अनिल परब देखील उपस्थित आहेत. त्यामुळं मनसे महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चेदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शिवसेना आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार? : या दोन भावंडांच्या भेटीचं आणखी एक महत्त्वाचं कारण मानलं जात असून, ते म्हणजे आगामी दसरा मेळावा. शिवसेनेच्या (उबाठा) दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच राज ठाकरे जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचल्याचे सध्या म्हटलं जात आहे. शिवसेनेचे नेते सध्या याबाबत सावध भूमिका स्पष्ट करत असले तरी, या दोन भावंडांच्या भेटीमध्ये दसरा मेळाव्याबाबत चर्चा होऊन शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं देखील सध्या म्हटलं जात आहे. त्यामुळं आता या दोन्ही नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेतून नेमकं काय समोर येतं? हे लवकरच स्पष्ट होईल.

