समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ!; मध्यरात्री वाहनाचे फुटले टायर, महामार्ग दुरुस्तीचा अजब प्रकार
समृद्धी महामार्गावर अचानक शेकडो खिळे आढळल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. हे खिळे नेमके कुणी टाकले, याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ असलेल्या पुलावर अज्ञात व्यक्तींनी मोठं-मोठे खिळे मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या खिळ्यांमुळं अनेक वाहनांचे टायर फुटले. त्यामुळं मध्यरात्री महामार्गावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. महामार्गावरील खिळ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.
महामार्गावरील खिळ्यांच्या प्रश्नाबाबत अनेक वाहनचालकांनी सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. ही घटना समोर येताच समृद्धी महामार्ग कर्मचाऱ्यांनी खिळे कापून काढले. तर काही ठिकाणी डांबर टाकून डागडुजी करण्यात आली. कोणीतरी लुटमारी करण्यासाठी हे केलं असावा, असा अंदाज मांडला जात होता. असं असताना रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कंत्राट दिलेल्या कंपनीनं महामार्गाच्या आत सोडण्यासाठी हे ‘नोजल’ म्हणजेच खिळे ठोकल्याचं समोर आलंय. निष्काळजीपणे काम करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
मध्यरात्री समृद्धी महामार्गावर वाहनं झाली पंक्चर : “बुधवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर प्रवास करणारी वाहने अचानक पंक्चर झाली. समाज माध्यमांवर अनेक वाहनचालकांनी त्याबाबत वाच्यता फोडली. रात्री साडेबाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर कोणीतरी खिळे ठोकलेत. त्यामुळं काही प्रवाशांची वाहनं पंक्चर झाली आहेत, अशी माहिती सावंगी इंटरचेंज इथल्या अधिकाऱ्यांना प्रवाशांनी दिली. त्यावर सुरक्षा रक्षक आणि समृद्धीचे अधिकारी मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी 120 प्रति ताशी वेगानं वाहनं चालवण्यास परवानगी असणाऱ्या म्हणजेच ‘ओव्हरटेकिंग लेन’वर मोठ्या प्रमाणात खिळे मारल्याचं दिसून आलं. त्याठिकाणी रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचं काम दिलेली मेगा कंपनी दुरुस्तीचं काम करत होती. त्यासाठी खराब असलेल्या भागात नोजल लावून केमिकल रस्त्यात सोडण्याचं काम केलं होतं. महामार्गावर लावलेले नोजल खिळ्यांसारखे असल्यानं त्या ठिकाणाहून जाणारी वाहनं पंक्चर झाली. त्यामुळं वाहनधारकांनी रोष व्यक्त केला. मात्र आता वाहतूक सुरळीत आहे,” असं पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितलं.
दुरुस्तीमुळं लावले नोजल : “रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामासाठी ग्राउटिंग इंजेक्शनचे नोजल वापरले होते. इपॉक्सी ग्राउटिंगद्वारे काँक्रीट रस्त्यांवरील भेगा दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. या प्रक्रियेत रस्त्यावर नोजल लावले होते. ते सकाळी कापून काढण्याची तयारी होती. मात्र, रात्री काही वाहनं चुकूनं त्या लेनमध्ये गेली. त्यामुळं टायर पंक्चर झाले. सकाळी सर्व नोजल हटवण्यात आले. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे,” अशी माहिती एमएसआरडीसीच्या मुख्य अभियंता संगीता जयस्वाल यांनी दिली.
इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे काय? : रस्त्यांवरील भेगा भरण्यासाठी उच्च-शक्तीचं इपॉक्सी रेझिन इंजेक्शनद्वारे वापरलं जातं. हे द्रव स्वरूपातील रेझिन भेगांमध्ये जाऊन त्यांना मजबूत करतं. त्यामुळे रस्त्याची मूळ ताकद परत आणते. पुलावरील दुरुस्तीसाठी ही पद्धत प्रभावी ठरते.
नागरिकांनी रस्ता केला बंद : समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा समजला जातो. नागपूर – मुंबई प्रवास वेगानं करण्यासाठी महत्वाच्या मार्गावर अशा पद्धतीनं अचानक खिळे मारल्यानं वाहनांचं नुकसान झालं. काही वाहनांचे अपघात थोडक्यात टळले. त्यामुळं वाहनधारकांनी रोष व्यक्त करत नुकसान होऊ नये, यासाठी काही काळ रस्ता बंद केला. पोलिसांनी तातडीनं वाहनधारकांना तिथून काढत वाहतूक सुरळीत केली. स्थानिक पोलिसांना आणि वाहतूक विभागाला माहिती न देता थेट रस्त्याचं काम सुरू करणं ही गंभीर बाब आहे, असं नागरिकाचं मत आहे. यापुढं अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय ठेवणं अत्यावश्यक असल्याचं या निमित्तानं समोर आलं.

