नरेंद्र मोदी 13 सप्टेंबरला आसाम दौऱ्यावर, बायो-रिफायनरी प्रकल्पाच्या पायाभरणीसह विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार!
आसामध्ये 18000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून (13 सप्टेंबर) दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी समारंभात सहभागी होतील. याचबरोबर, मिळालेल्या माहितीनुसार, आसामध्ये 18000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
मोदींचा गेल्या सात महिन्यांत दुसऱ्यांदा आसाम दौरा : दरम्यान, पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय. तसंच गेल्या सात महिन्यांत नरेंद्र मोदी यांचा हा आसाम दौरा दुसऱ्यांदा असणार आहे. यापूर्वी ते 24 फेब्रुवारी रोजी अॅडव्हांटेज आसाम 2.0 च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.
भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी समारंभात : आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.20 वाजता विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर, सायंकाळी 5.25 वाजता ते गुवाहाटीतील खानापारा इथं भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी समारंभात उपस्थित राहतील,” असं डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
1200 हून अधिक कलाकार कार्यक्रम सादर करणार : डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी पुढं म्हटलं की, “13 सप्टेंबरला डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी समारंभादरम्यान 1200 हून अधिक कलाकार एक अनोखा कार्यक्रम सादर करतील आणि एकत्रितपणे 18 मिनिटांपेक्षा जास्त काळ भूपेन हजारिका यांची 14 सदाबहार गाणी गातील. तसंच समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते भूपेन हजारिका यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देखील प्रकाशित केलं जाईल, जे भारतीय संविधानानं मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये प्रकाशित केलं जाईल. याशिवाय, हे पुस्तक एकूण 20 लाख लोकांपर्यंत पोहोचवले जाईल,” असंही डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
100 रुपयांचं नाणं : याचबरोबर, “रिझर्व्ह बँकेनं भूपेन हजारिका यांच्या सन्मानार्थ त्यांची प्रतिमा असलेलं 100 रुपयांचं नाणं देखील जारी केलं आहे आणि अर्थ मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृतपणे या नाण्याचं अनावरण करतील,” असंही डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
लिंक रोड प्रकल्पाची पायाभरणी : दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मंगलदोई येथे पोहोचतील. याठिकाणी दरांग मेडिकल कॉलेज, एक नर्सिंग कॉलेज आणि एक जीएनएम स्कूल यासह एकूण 567 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येईल. तसंच ते ब्रह्मपुत्र नदीवर कुरुवा आणि नरेंगी दरम्यान जवळपास 1200 कोटी रुपयांच्या बांधण्यात येणाऱ्या पुलाची आणि 4500 कोटी रुपयांच्या बांधण्यात येणाऱ्या लिंक रोड प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील. हा लिंक रोड नरेंगी, दिगारू, बैहाटा आणि कुरुवा यांना जोडणारा आहे, ज्यामुळं गुवाहाटी शहर एकाच वळणावर येईल.
बायो-रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी : यानंतर, नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता नुमालीगड रिफायनरी इथं पोहोचतील. ते 5000 कोटी रुपयांच्या नुमालीगड रिफायनरीद्वारे बांधलेल्या भारतातील पहिल्या बायो-रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी करतील. ही बायो-रिफायनरी बांबूपासून इथेनॉल आणि इतर अनेक उत्पादनांची निर्मिती करणार आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे 7000 कोटी रुपयांच्या पॉलीप्रॉपिलीन उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी करतील.

