सेल्समन माहिती देताना महिलेनं दाबला अॅक्सिलरेटर, शोरुमची काच फोडून रस्त्यावर पलटी होऊन कारचा अपघात
दिल्लीतील प्रीत विहारमध्ये एका शोरुममध्ये महिलेनं चारचाकी खरेदी केल्यानंतर अपघात झाला. हा अपघात कार खरेदीनंतर शोरुमच्या बाहेर घडला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीसोबत अलिशान कार विकत घेतली. या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी प्रदीप पत्नीसह कारच्या शोरूममध्ये गेले. त्यावेळी कंपनीच्या सेल्समननं त्यांना गाडीची माहिती दिली. त्यावेळी अचानक कारमधील ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या महिलेनं चुकून अॅक्सिलरेटर जोरात दाबला. त्यामुळं महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं. नवीन अलिशान कार शोरूमची काच फोडून पहिल्या मजल्यावरुन थेट रस्त्यावर कोसळली. 15 फुटांवरुन कोसळलेली कार रस्त्यावर उलटी पडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण : प्रदीप हे 29 वर्षीय पत्नी मणीसोबत प्रीत विहारमध्ये थार शोरूममध्ये कार खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी सेल्समन विकास हे प्रदीप यांच्या पत्नीला कारची सविस्तर माहिती देत होते. यादरम्यान ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या महिलेनं अॅक्सिलरेटर दाबला. त्यामुळं शोरूमच्या पहिल्या मजल्यावर उभी असलेल्या गाडीनं वेग घेतला. कार शोमरूच्या काचेवर जाऊन आदळली. यानंतर कार रस्त्यावर कोसळून पलटली. ही घटना घडली तेव्हा प्रदीप, त्यांची पत्नी आणि सेल्समन विकास कारमध्ये होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिलायवर व्हायरल होत आहे.
#दिल्ली : लक्ष्मीनगर में एक लड़की महिंद्रा #शोरूम पहुंची #थार गाड़ी लेने, लड़की #ड्राइविंग सीट पर बैठी एक्सीलेटर पर रखा #गाड़ी पहली मंजिल का शीशा तोड़ते हुए सीधे नीचे गिरी।#Delhi #Mahindra #mahindrathar #attention#pmhardoi pic.twitter.com/ZHNUjYqyM4
— Prashant mishra Hardoi (@PM_HARDOI) September 9, 2025
प्रकरणाची चौकशी सुरू : ‘सोमवारी संध्याकाळी 6.08 वाजता गाझियाबादच्या इंदिरापुरम इथल्या रहिवासी मणी पवार यांचा मेडिको-लीगल केस (एमएलसी) निर्माण विहारमधील मलिक हॉस्पिटलमधून प्राप्त झाला. तपासादरम्यान असं आढळून आले की मणी आणि त्यांचे पती प्रदीप यांनी निर्माण विहारमधील चाकचाकी शोरूममधून अलिशान कार खरेदी केली होती. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. तसंच या अपघाताबाबत कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जमिनीवर उलटलेला चार आणि पहिल्या मजल्यावरील काचेच्या भागात रिकामी फ्रेम दिसत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत”, अशी माहिती पोलीस उपायुक्त (पूर्व) अभिषेक धानिया यांनी दिली.

