ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गावात माणसं कमी, म्हशी जास्त! अमरावतीजवळचं दिवानखेड बनलं ‘दुग्धगंगा’

तीन चार पिढ्यांपासून दिवानखेड गावात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय होतो. या व्यवसायामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. दुधाच्या व्यवसायातून गावानं प्रगती केली, याबाबतचा स्पेशल रिपोर्ट वाचा!

अमरावती- एखाद्या गावात माणसांपेक्षा जनावरांची संख्या अधिक आहे, असं जर कोणी सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण, अमरावती शहरालगत दिवानखेड नावाचं गाव आहे. या गावात माणसांपेक्षा चक्क म्हशींची संख्या जास्त आहे. गावातील जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात म्हशी बांधलेल्या दिसतात. अमरावती ते मार्डीमार्गावर डाव्याबाजूला तिवसा तालुक्यात येणारं दिवानखेड हे गाव अमरावती शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. माणसांपेक्षा म्हशींची संख्या जास्त असणाऱ्या दिवानखेड गावासंदर्भात ‘खरा संवाद’चा हा स्पेशल रिपोर्ट

एका माणसामागं चार म्हशी- दिवानखेड गावात दोनशेच्या आसपास घरं आहेत. गावात 90 टक्के कुटुंब हे गवळी समाजाचे आहेत. तर बोटावर मोजण्याइतकीचं इतर समाजाची घरं आहेत. या गावची लोकसंख्या 2,500 इतकी आहे. गावात म्हशींची संख्या ही 10 हजारांहून अधिक आहे. म्हशींसोबतच अनेकांच्या घरी कमी संख्येत गायी आणि बकऱ्यादेखील आहेत. “आमच्या गावात एका माणसामागे चार म्हशी आहेत. गावात जवळपास प्रत्येकाचा दुधाचा व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय आहे. अनेक कुटुंबाकडे 15 ते 20, तर कोणाकडे 35 तर काही जणांकडे 40 म्हशी आहेत, ” असं दीपक काळे यांनी सांगितलं. प्रशांत औरंगपुरे यांच्या घरात दहा व्यक्ती राहतात. त्यांच्या घरी सर्वाधिक 50 म्हशी आहेत.

 

रोज निघतं दहा हजार लिटर दूध- सकाळी दिवस उजाडताच प्रत्येक घरात म्हशीचा गोठा साफ करून दूध काढायचं काम सुरू होतं. सकाळी 7.30 वाजेपर्यंत गावातील प्रत्येकाच्या गोठ्यातलं दूध निघतं. सकाळी आणि सायंकाळी गावातून एकूण 10 हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. पोळ्यापासून संपूर्ण हिवाळ्यात उन्हाळा लागेपर्यंत दुधाच्या उत्पनानचं प्रमाण आणखी वाढतं, असं दीपक काळे यांनी सांगितलं.

 

अमरावती शहरात पाठविले जातं दूध- तीन चार पिढ्यांपासून दिवानखेड गावात निघणारं दूध हे अमरावती शहरात जातं. पूर्वी अनेकांच्या घरात दुधाचा रतीब असायचा. प्रत्येकाच्या घरापर्यंत सायकलनं दूध पोचवलं जायचं. आता दुचाकीनं हे दूध नेलं जातं. काही वर्षात घरोघरी असणारा दुधाचा रतीब कमी झाला. यामुळं दूध डेअरी आणि हॉटेललाच दूध पुरवलं जातं, असं मुकेश खताडे यांनी सांगितलं.

 

दुधाच्या व्यवसायासोबत शेतीची साथ – अवती-भोवती डोंगर आणि हिरवागार परिसर असणाऱ्या भागात वसलेल्या दिवानखेड येथे परंपरेनं दुधाचा व्यवसाय सुरू आहे. दुधाच्या व्यवसायाला जोड म्हणून अनेकांच्या जवळ शेती आहे. म्हशीला लागणाऱ्या ढेपचा भाव पन्नास रुपये किलो आणि दुधाचे दर 70 रुपये लिटर हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. यामुळं शेती हा जोडधंदा आर्थिक बाजू बळकट करणारा आहे, असा व्यवसायाचा अनुभव दीपक काळे यांनी सांगितला. गावात अनेकांनी अमरावती शहरात घर बाधलं आहे. सदनिका घेऊनही कुटुंबांची सर्व अर्थव्यवस्था दुधाच्या व्यवसायावरच अवलंबून आहे. शहारातील घरं भाड्यानं देऊन प्रत्येकजण गावातच आपला व्यवसाय करण्यावर भर देत आहेत, असं ग्रामस्थ सांगतात.

 

शेणखताला मागणी- गावात मोठ्या प्रमाणात शेणखत निघतं. ग्रामस्थ आपल्या शेतीसाठी या शेणखताचा वापर करतात. यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी दिवानखेड येथून शेणखत नेतात. 2500 रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दरानं हे शेणखत विकलं जातं. त्यामुळे शेणखाच्या विक्रातूनदेखील आर्थिक कमाई होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.