बाधित पिकांसाठी १०८ कोटी, तुम्ही ई-केवायसी केली का?

अमरावती : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या कालावधीत १.६९ लाख शेतकऱ्यांच्या १.२४ लाख हेक्टरमधील पिके व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाने १०८.७२ कोटींचा मदत निधी शासनाने मंगळवारी मंजूर केला. सणा-सुदीत मदत होण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या त्वरित अपलोड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
१,६८,५३३ शेतकऱ्यांच्या १,२३,७६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. हेक्टरी ८,५०० रुपयांप्रमाणे १०३.०६ कोटींचा मदतनिधी मंजूर करण्यात आला. याशिवाय १४५ शेतकऱ्यांचे ३०.२३ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले. यासाठी हेक्टरी १७ हजार रुपयांनुसार ५.१४ कोटी मंजूर झाले. ३,४०७ शेतकऱ्यांच्या २,४९२ हेक्टरमधील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हेक्टरी २२,५०० रुपये प्रमाणे ५.६० कोटी असे एकूण १०८.७१ कोटींचा मदतनिधीची शासनाने २३ सप्टेंबरला मंजूर केला.
वरूड तालुक्यात एक व मोर्शी तालुक्यात ३५ शेतकऱ्यांची १२.१५ हेक्टर शेती खरडून गेली. हेक्टरी ४७ हजार रुपये याप्रमाणे ५.७८ लाख रुपयांच्या शासन निधीदेखील आता मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
मंजूर निधी अमरावती १७.१८ कोटी, भातकुली १६.८५ कोटी, चांदूर रेल्वे १३.४३ कोटी, धामणगाव १२.३९ कोटी, नांदगाव खंडेश्वर ११.३२ कोटी, अचलपूर १०.७४ लाख, अंजनगाव ११.६१ लाख, धारणी २.३७लाख, चिखलदरा २३.१२ लाख, दर्यापूर १०.५८ कोटी, मोर्शी ७.६० कोटी, तिवसा १०.२० कोटी, चांदूर बाजार ८.६१ व वरुड ६,६३० रुपये मंजूर आहे.
शासन मदत निधीतून कर्ज कपातीस मनाई डीबीटी पोर्टलवरून हा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. हा मदतनिधी बँकांना संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज वसुली खात्यात वळता करता येणार नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना बजावले.

