अंजनगाव सुर्जी येथे भरधाव ट्रकखाली माकड ठार; प्राणीमित्र गौरव वालकडे यांनी केला अंतिम संस्कार

— सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी; शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर सायंकाळी ६:३० वाजता दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध माकडाचा जीव गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आपल्या पिलासह रस्ता ओलांडणाऱ्या माकडीनला जोरदार धडक दिली. या धडकेत माकडीन गंभीर जखमी झाली. ह्या घटनेची माहिती शहरातील प्राणीमित्र गौरव वालकडे यांना कळताच तात्काळ त्यांनी पशुवैद्यकासह घटनास्थळी दाखल होत जखमी माकडीनवर उपचार केला. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यात पिल्लू सुदैवाने बचावले. या घटनेने शहरातील प्राणीप्रेमी आणि नागरिकांत संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
मृत माकडीनचा अंतिम संस्कार शहरातील प्राणीप्रेमी व कार्यकर्ते गौरव वालकडे यांच्यासह योगेश भारसाकडे, अक्षय बोडखे यांनी विधिपूर्वक केला. प्राण्यांप्रती असलेली करुणा व संवेदनशीलता जपत त्यांनी माकडीनचे दहन केले. त्यांच्या या कार्याची समाजातील विविध स्तरांतून प्रशंसा होत आहे. “प्राण्यांचेही जीवन मोलाचे आहे, त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे,” असे मत प्राणीमित्र श्री. वालकडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शहरातील प्रमुख मार्गांवर वाहने भरधाव वेगाने धावत असल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्त्यावरून वारंवार प्राणी व लहान मुले जात असतात. त्यामुळे वाहने नियंत्रित वेगात चालविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा, प्राणीसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

