मेळघाटच्या घनदाट जंगलात डोंगराला पडलं टक्कल! ‘चाटीबल्डा कॅम्प’ ठरतोय जंगलाचा सुरक्षा कवच
वाघ संरक्षण, अवैध शिकार नियंत्रण आणि जंगल निरीक्षणासाठी वर्षभर मेळघाटातील 'चाटीबल्डा कॅम्प'मध्ये (Chatibalda Camp) वनकर्मचारी तैनात असतात.

अमरावती : जंगल सुरक्षित राहावं यासाठीही प्रयत्न व्हावेत, असं अनेकदा बोललं जातं, ऐकलं जातं. जंगलाच्या सुरक्षेसाठी वन विभागाच्या वतीनं नेमके काय प्रयत्न केले जातात? विशेष म्हणजे, हे काम नेमकं कसं चालतं? हे सगळं घनदाट जंगलात असणाऱ्या वन विभागाच्या कॅम्पवर गेल्यावरच कळतं. मेळघाट जंगल संरक्षणासाठी या अशा कॅम्पची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चार ते पाच व्यक्ती सज्ज असणारा हा कॅम्प म्हणजे जंगलाचं सुरक्षा कवच आहे. मेळघाट चिखलदरा वनपरिक्षेत्र हद्दीत घनदाट जंगलात डोंगराला जणू टक्कल पडलंय असा भास होणाऱ्या ‘चाटीबल्डा कॅम्प’ (Chatibalda Camp) संदर्भात माहिती देणारा “खरा संवाद ” चावलचा हा स्पेशल रिपोर्ट.
‘असा’ आहे ‘चाटीबल्डा कॅम्प’: गुगामल व्याघ्र प्रकल्पांतर्गत चिखलदरा येथील वन प्रशिक्षण केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात उंच ठिकाणी ‘चाटीबल्डा’ नावाचा कॅम्प आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी हा कॅम्प उभारण्यात आला. या कॅम्पवर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाला अशा तिन्ही ऋतूत बाराही महिने वन कर्मचारी, वन मजूर तैनात असतात. उंच ठिकाणावर असणाऱ्या या कॅम्पवरुन जंगलावर दूरपर्यंत लक्ष दिलं जातं. सिमेंट विटांनी वाढलेल्या या पक्क्या कॅम्पला ताराचं कुंपण आहे. याठिकाणी वन रक्षकासह चार ते पाच रोजंनदारी वनमजूर तैनात असतात. या कॅम्पच्या परिसरात वाघ, अस्वल या प्राण्यांचा वावर आहे. कॅम्पच्या आवारात लाकडाचं अतिशय सुंदर मचाण देखील उभारण्यात आलं आहे.
‘असा’ आहे चाटीबल्डा शब्दाचा अर्थ: गुगामल व्याघ्र प्रकल्पात ज्या ठिकाणी ‘चाटीबल्डा कॅम्प’ आहे त्या परिसरात पंचवीस वर्षांपूर्वी चुर्णी नावाचं गाव होतं. या जंगलातून हे गाव स्थलांतरित करण्यात आलं. या गावात वास्तव्याला असणाऱ्या आदिवासी आणि गवळी समाजातील लोकांची या जंगल परिसरातील उंच डोंगरावर कुटकीची शेती होती. आदिवासी भाषेत टेकडी किंवा डोंगराला पल्डा असं म्हणतात. उंच डोंगरावर असणारा हा भाग उन्हाळ्यात दुरून एखाद्याचं टक्कल जसं चमकतं तसा चमकायचा. पहाडाच्यावरच्या भागावर टक्कल अर्थात चाटी चमकते. या कल्पनेतून या भागाचं नाव ‘चाटीबल्डा’ असं पडलं, अशी माहिती वनमजूर पंजाब गवई यांनी ‘खरा संवाद’ शी बोलताना दिली.
कॅम्पवर ‘अशी’ आहे व्यवस्था : चाटीबल्डा कॅम्पवर सर्वात महत्वाचं म्हणजे विजेची व्यवस्था आहे. यासह सौरऊर्जेची देखील व्यवस्था आहे. या जंगलात वन विभाच्या परवानगीशिवाय कोणालाही फिरकण्याची परवानगी नाही अशावेळी जंगलात कुठे काही संशयास्पद हालचाल दिसली तर त्याबाबत माहिती देण्याकरिता वायरलेस यंत्रणेची व्यवस्था आहे. वायरल्सच्या माध्यमातून मेळघाटात जंगलात इतर कॅम्प परिसरात घडणाऱ्या घटनांची माहितीही त्वरित कळते. चार पाच व्यक्ती झोपू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी असून स्वयंपाकाची व्यवस्था देखील आहे. चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी याठिकाणी सर्व व्यवस्था करून देतात. “आम्ही जंगलात नियमित गस्त घालतो. वाघाकडं लक्ष देतो. माझ्याकडं या कॅम्पवर एकूण चार रोजंदारी मजूर आहेत. भाले, विळा, कुऱ्हाड आम्ही कायम आमच्या जवळ ठेवतो”, असं या कॅम्पवर तैनात असणाऱ्या वनपाल एक.बी.सावलकर यांनी सांगितलं.
जंगल सफारीत दिसतो कॅम्प : चिखलदरा वन परिक्षेत्र कार्यालय येथून दिवाळीनंतर वैराट जंगल सफारीला सुरुवात होईल. या जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना लघुशंका वगैरे लागल्यास चाटीबल्डा कॅम्पवर काही वेळासाठी थांबवलं जातं. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना या कॅम्पवर काही वेळ घालवता येऊ शकतो. या कॅम्पच्या पुढे अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर वैराट येथे असाच कॅम्प उंच पहाडावर आहे.
मेळघाटात शंभरच्यावर कॅम्प: “जैवविविधतेनं समृद्ध असणारं मेळघाटचं जंगल हे १ हजार ६७६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलं आहे. यापैकी गुगामल अभयारण्य ३६१ चौरस किलोमीट, सिपना वन्यजीव विभाग ८०० चौरस किलोमीट क्षेत्रात आणि बफर झोन ५३४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये विभागलं आहे. या भल्यामोठ्या जंगल परिसरावर लक्ष ठेवण्याकरिता चाटीबल्डा कॅम्पप्रमाणे लहान मोठे असे एकूण शंभरच्यावर कॅम्प मेळघाटच्या जंगलात आहेत,” अशी माहिती चौराकुंड वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेरडे यांनी दिली.

