ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

140 नक्षलवाद्यांसह शस्त्र खाली टाकणारा ‘रुपेश’ कोण आहे? बस्तरमध्ये आज होणार दशकातील सर्वात मोठी शरणागती!

नक्षलवादी केंद्रीय कमिटी सदस्य आणि प्रवक्ता रुपेश आज छत्तीसगडमध्ये पोलिसांना शरण येणार आहे. त्याच्यासोबत 140 नक्षलवादीदेखील आत्मसमर्पण करणार आहेत.

नागपूरः दंडकारण्यच्या लाल मातीवर पुन्हा एकदा शस्त्र खाली ठेवण्याची वेळ आली आहे. भूपती याच्या शरणागतीनंतर नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला असताना, केंद्रीय कमिटी सदस्य आणि प्रवक्ता रुपेश देखील आज छत्तीसगडमध्ये पोलिसांना शरण येणार आहे. त्याच्यासोबत दोन डीकेएसझेडसी आणि 15 डीव्हीसी पातळीवरील सुमारे 140 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत.

भैरमगड येथे आत्मसमर्पण होणार : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड येथे आत्मसमर्पण होणार आहे. बस्तर परिसरात हे दशकातील सर्वात मोठं आत्मसमर्पण असेल. सुरक्षा दलांनी यासाठी व्यापक तयारी सुरू केली असून छत्तीसगड सरकारनंही यासाठी उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन केलं आहे. आज शरण येणाऱ्यांमध्ये सशस्त्र दस्तांच्या सदस्यांपासून महिलांपर्यंत विविध कॅडर तसेच दक्षिण व पश्चिम उपझोनमधील सक्रिय माओवादी कार्यकर्ते समाविष्ट आहेत.

रुपेश कोण आहे? : दोन दशकांहून अधिक काळ नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेला रुपेश हा एक रणनीतीकार म्हणून ओळखला जातो. तो नक्षलवादाच्या केंद्रीय कमिटीचा अधिकृत प्रवक्ता होता. सुरक्षा यंत्रणेच्या सूत्रांच्या मते, रुपेशचं खरे नाव सतीश उर्फ ‘आसन्ना’ असून त्याच्यावर लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. बस्तर परिसरातीलरहिवासी असलेला रुपेश 20 वर्षांपूर्वी नक्षलवादाशी जोडला गेला. यानंतर लवकरच त्यानं दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं. प्रचार, भरती तसेच जंगलात नवीन तळ निर्माण करण्याचं काम त्याच्या जबाबदारीत होत असे. गेल्या काही महिन्यांपासून तो सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात असल्याचं समजते. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षली संघटनेतील संवाद अधिक तीव्र झाला आणि अखेर रुपेशनंही शस्त्र टाकण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

रुपेशच्या नेतृत्वात आत्मसमर्पण करणार : खरं तर 15 ऑक्टोबर रोजी नक्षल चळवळीतील नेता आणि पोलिट ब्युरो सदस्य वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीमध्ये आत्मसर्पण केलं. त्याच दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबरला रावघाट कमिटीतील सुमारे 50 नक्षलवादी जंगलातून बाहेर येऊन कांकेर जिल्ह्यात दाखल झाले.

16 ऑक्टोबर रोजी माड डिव्हिजनचा संपूर्ण विभाग अबूझमाडच्या जंगलातून बाहेर पडून इंद्रावती नदी मोटरबोटनं पार करून चार बसमध्ये बसून जगदलपूर मुख्यालयात पोहोचला. या सर्वांचं नेतृत्व वासुदेवराव उर्फ रूपेश यानं केलं. आज हे सर्व नक्षलवादी अधिकृतपणे आत्मसमर्पण करणार आहेत.

दंडकारण्यमधील नेटवर्क जवळपास संपुष्टात : लाल चळवळीचा अस्त होताना गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये 270 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. भूपती, रुपेश, रचिता आणि इतर उच्चस्तरीय नक्षलवादी नेत्यांच्या शरणागतीनंतर दंडकारण्यमधील नेटवर्क जवळपास निष्क्रिय झालं आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सततच्या कारवाया आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणांमुळे नक्षल चळवळीचा पाया ढासळल्याचं मानलं जात आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांना शासनाकडून पुनर्वसन, रोजगार आणि आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.

 

नक्षलवादी चळवळीचा गड कोसळला : शांतीच्या युगाची पाऊलवाट भूपतीनं आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षलवादी चळवळीचा गड कोसळला. आता रुपेशसह 140 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे चळवळीचा श्वास थांबण्याचा मार्ग सुरू झाला आहे. दंडकारण्यमध्ये एका नव्या, शांतीच्या युगाची पाऊलवाट तयार होत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार, मुख्यमंत्री सकाळी १०:५५ वाजता सरकारी विमानानं जगदलपूरच्या दंतेश्वरी विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर, ते सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत पोलीस लाईन्समध्ये आयोजित आत्मसमर्पण समारंभात सहभागी होतील आणि पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.