आक्षेप पडताळणीत प्रशासनाची कसोटी पथके तयार, एसडीओ प्राधिकृत अधिकारी
नगरपरिषद, नगर पंचायतींच्या मतदार यादीवर हरकतीचा डोंगर

अमरावती : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादीवर तब्बल १३ हजारांवर आक्षेप अर्ज दाखल झाल्याने पडतळणीसाठी प्रशासनाची कसोटी लागत आहे. यामध्ये मतदार एका प्रभागात वास्तव्य करीत असताना नाव मात्र दुसऱ्या प्रभागात असल्यावर सर्वाधिक आक्षेप आहेत. ३१ ला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल.
जिल्ह्यातील १० नगरपरिषद व २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, मतदारयादीत सावळागोंधळ असल्याने नागरिकांना यादीत नावे शोधताना नाकीनऊ आले. मोर्शी येथील दोन प्रभागातील शेकडो मतदारांची नावे गहाळ झाली आहे. शिवाय प्रशासनाद्वारा एकगठ्ठा आक्षेप स्वीकारण्यात आलेले नाही, त्यामुळे आक्षेपांची संख्या वाढली आहे. दरम्यान नगरपरिषद स्तरावर पथके तयार करण्यात आलेली आहेत. शिवाय केंद्रस्तरीय अधिकारीदेखील साहाय्य करीत आहे. आक्षेपांच्या पडताळणी व सुनावणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
परिसरच वगळला असेल तर पुरावा नको एखाद्या प्रभागातील काही परिसरच मतदार यादीत वगळल्या गेला असल्यास आक्षेपाला पुराव्याची गरज लागत नाही. काही मोजक्या मतदारांची नावे व निवासाचा पुरावा दिल्यानंतर त्या मतदार यादी दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत.
अशा प्रकारात आक्षेप घेणाऱ्या मतदाराला सोबत अधिक पुरावे जोडण्याची गरज नाही. यादीतील नेमका परिसर कुठला व तेथील मतदार किती, यावरही तो आक्षेप यंत्रणेला ग्राह्य धरावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषद मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य एका प्रभागात आणि मतदान दुसऱ्या प्रभागात असा घोळ आहे.
कागदपत्रांची पडताळणी मतदार यादीत मृतांची नावे आहेत, शिवाय दुबार नावे आहेत, काही मतदार कायमचा परिसर सोडून गेलेले आहेत, अशा नावांबद्दल आक्षेप असल्यास पुराव्यांची आवश्यकता आहे. ते कागदपत्र आक्षेपासोबत जोडणे आहे. बहुतांश आक्षेपांवर सुनावणी घेतल्या जात नाही. प्राधिकृत अधिकाऱ्यांना वाटल्यास ते तशा अर्जावर सुनावणी घेऊ शकतात.

