निंभी येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

मोर्शी : नजीकच्या निंभी येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुपारी ४ च्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली.
राहुल यशवंत छापाने (रा. निंभी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे निंभी शिवारात सहा एकर शेती आहे. बँकेचे ६ लाख रुपये व सावकारी कर्ज घेऊन त्यांनी शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी केली. मात्र, यंदा अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच फुटल्या नाहीत. परिणामी पीक पूर्णतः सडून गेल्यामुळे शेतातच त्याचे खत झाले. रोखीचे पीक हातून गेल्यामुळे दिवाळीचा किराणासुद्धा राहुल छापाने आणू शकले नाही. पीक वाया गेल्याने पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत असलेल्या राहुल छापाने यांनी दिवाळीच्या दिवशी दुपारी ४ वाजता स्वतःच्या राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले असल्याचे लक्षात येताच त्यांना लगेच वाहनातून अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई-वडील आहेत.

