महत्वाचे

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन 14567’ — विश्वासाचा हात, सन्मानाचे जगणे

अमरावती : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन’ 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.

‘सून खाऊ घालत नाही’, ‘पोरगा परदेशात आहे’, ‘घरात आम्ही दोघेच एकटे’, ‘नातेवाईकांनी घर बळकावले’ अशा असंख्य व्यथा आणि तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक या हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत.

महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या मार्फत राबवली जाते. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशन गेली 37 वर्षे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहे. या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.

ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या हेल्पलाइनवर आजपर्यंत चार लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले असून, तीस हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.

हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत सेवांमध्ये —
आरोग्य, निवारा, आश्रयगृह, वृद्धाश्रम व डे केअर सेंटरची माहिती, कायदेशीर सल्ला, मालमत्ता व कौटुंबिक वादांवरील मार्गदर्शन, भावनिक आधार, ताण-तणाव व राग व्यवस्थापन, तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांचे पुनर्वसन, पोलीस प्रशासनाशी समन्वय आणि समुपदेशन — या सेवा पुरवल्या जातात.

‘एल्डर लाईन 14567’ ही केवळ हेल्पलाईन नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सन्मानाने जगण्याचा आधार आहे. या सेवेचा लाभ सर्व गरजू वयोवृद्धांनी घ्यावा आणि समाजातील प्रत्येकाने या सेवेबद्दल जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.