महत्वाचे

सरदार पटेल १५० जयंतीनिमित्त अमरावतीत ‘युनिटी वॉक’; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

अमरावती (प्रतिनिधी)– लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने सोमवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता ‘युनिटी वॉक’ या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला विमलाबाई देशमुख सभागृहातून सुरुवात होणार असून युवकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पदयात्रेच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, महापालिका, आरोग्य विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत “सरदार @ १५० – एकता अभियान” अंतर्गत ही जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विमलाबाई देशमुख सभागृहातून निघालेली ही यात्रा पंचवटी चौक, इर्विन चौक मार्गे जाणार असून इर्विन चौक येथे पथनाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर पदयात्रेचा समारोप गर्ल्स हायस्कूल चौकातून परत विमलाबाई देशमुख सभागृहात होणार आहे. पदयात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पदयात्रेसाठी पोलिस विभाग, महापालिका व आरोग्य विभागाला आवश्यक ती सहकार्याची सूचना दिली. पोलिसांनी वाहतूक नियंत्रण व सुरक्षा व्यवस्था पाहावी, महापालिकेने मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, तर आरोग्य विभागाने वैद्यकीय पथक तैनात करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पदयात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, खेळाडू, पोलिस भरतीतील युवक, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले. तसेच सध्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.