महाराष्ट्र

मेळघाटात रोजगारवाढीस चालना; कोठा येथे कोसा साडी प्रकल्प उभारणार — नितीन गडकरी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती :  मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे. धारणी तालुक्यातील कोठा येथे संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबू वस्तू निर्मिती सुरू आहे. याच ठिकाणी पाच कोटी रुपयांचा कोसा साडी निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कांचन गडकरी, केंद्राच्या अध्यक्षा डॉ. निरुपमा देशपांडे आणि योगेश बापट आदी उपस्थित होते.

या वेळी गडकरी म्हणाले की, आदिवासी समाजाच्या जीवनमान उंचावण्यासाठी उद्योगाधारित संधी महत्त्वाच्या आहेत. बांबू केंद्रात तयार होणाऱ्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने स्थानिकांना अधिकाधिक कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोसा साडी प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची स्वनिधीतून देणगी आणि तीन कोटी रुपयांचे केंद्र सरकारचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल. साडीनिर्मितीसाठी आवश्यक प्रशिक्षण व्यवस्थाही उभारली जाणार आहे.

मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची दखल घेत गडकरी म्हणाले की, या भागाचा सर्वांगीण विकास रस्त्यांच्या सुधारणेशिवाय शक्य नाही. महामार्ग प्राधिकरणाकडून प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक युवकांच्या शिक्षणासाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच मदर डेअरीच्या सहकार्याने धारणीसह आणखी एका ठिकाणी दूध संकलन केंद्र उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

कार्यक्रमात कारागीर हाटचे विमोचन, प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार आणि गरजू कुटुंबांना गॅस शेगडींचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. निरुपमा देशपांडे यांनी केले.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.