“निवडणूक श्रीमंतांची, गोरगरिबांची नाही!” — एमआयएम उमेदवाराचा आयोगावर संतापजनक आरोप

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ नंतर निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या फलक, झेंडे व काॅर्नर सभा परवानगी पत्रातील अटी पाहून “ही निवडणूक गोरगरिबांसाठी नसून केवळ श्रीमंत उमेदवारांसाठीच आहे”, असा तीव्र आरोप एमआयएमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी पत्रकार परिषदेत केला.
डोंगरदिवे म्हणाले, “नगरपरिषद निवडणूक अधिनियम स्पष्टपणे सांगतो की निवडणूक निष्पक्ष, भयमुक्त व समतेने व्हावी. मात्र सद्य परिस्थितीत गरिब उमेदवारांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.”
फलक व बॅनर लावण्यासाठी घरमालकाची संमती, त्या घराचा टेक्स भरल्याची पावती, झेंडा लावायचा असल्यास घरटॅक्स भरणे अनिवार्य, तसेच ज्या घराजवळ काॅर्नर सभा होणार त्याचेही टेक्स भरलेला असणे आवश्यक— अशा कडक अटींमुळे सामान्य उमेदवाराला निवडणूक लढवणेच कठीण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
डोंगरदिवे यांनी टोला हाणत म्हटले, “उमेदवाराने शहरात सर्वत्र झेंडे वा फलक लावायचे झाले तर प्रत्येक ठिकाणी संबंधित घरमालकाचा टॅक्सही उमेदवारानेच भरावा लागणार आहे. मग या शहरात निवडणूक लढवायला सक्षम फक्त श्रीमंत लोकच राहणार. हा नियम म्हणजे गरीब-मैत्री लोकशाहीला गुदमरवण्याचा प्रयत्न आहे.”
याच नियमाविरोधात एक दिवसात जाचक अटी मागे न घेतल्यास निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष सै. मुजीब सै. रफीक, सै. नाजीमोद्दीन, माजी नगरसेवक रहीमभाई, अॅड. मुजाहीद शेख, मो. निसाख, विश्वास इंगळे, मो. जुबेर, मो. यूनूस उपस्थित होते.
-आयोगाचे स्पष्टीकरण
या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोहकरे यांनी स्पष्ट केले की, “परवानगी पत्राचा नमुना हा निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसारच तयार करण्यात आलेला आहे. राबविण्यात येणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसारच होत आहे.”

