नव्या उमेदीने शिवसेना सज्ज; अडसूळांसोबत प्रभागनिहाय निवडणूक समीक्षा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (शिंदे गट) राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी आमदार व राष्ट्रीय सचिव अभिजीत अडसूळ यांच्या उपस्थितीने शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्पृहा डकरे यांच्या निवासस्थानी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व प्रभागांचा सखोल आढावा घेत निवडणुकीचे दिशा-निर्देश निश्चित करण्यात आले.
अडसूळ यांनी प्रभागनिहाय मतदारसंघाची स्थिती, स्थानिक समस्या, जनसंपर्काची गरज आणि आगामी प्रचार आराखडा यावर बारकाईने चर्चा केली. निवडणूक व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि जनतेपर्यंत पोहोचण्याच्या प्रभावी उपाययोजना यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस शिवसेना उपनेते ज्ञानेश्वर धाने, सहसंपर्क प्रमुख श्याम देशमुख, जिल्हाप्रमुख सुनील डिके, तालुका प्रमुख नितीन चौखंडे, शहर प्रमुख मुन्ना इसोकार तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजूट आणि सक्रियतेने निवडणूक लढवण्याचा निश्चय व्यक्त केला.

