महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत २५ हजार दुबार नावे? तपासणीकडे लक्ष

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत ३३९१६७ पुरुष, तर ३,३७९३२ महिला मतदार आहेत. तर इतरदेखील ६८ मतदार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अमरावती येत्या काळात होऊ घातलेल्या अमरावती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी प्रशासनाने २२ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी अधिकृत प्रसिद्ध केली आहे. मात्र या यादीत तब्बल २५ हजार मतदारांची नावे दुबार असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही नावे मतदार यादीतून हटविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार असून यादीत घोळ असल्याचे स्पष्ट होते, हे विशेष.
महापालिका प्रशासनाने सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २२ प्रभागाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यात एकूण ६ लाख ७७ हजार १६७मतदारांची संख्या आहे. ३३९१६७ पुरुष, ३३७९३२ महिला तर ६८ इतर मतदारांचा समावेश आहे. मात्र प्रशासनाने त्यांच्या स्तरावर केलेल्या तपासणीत तब्बल २५ हजार मतदारांची नावे दुबार असून ही यादी देखील तयार केली आहे. या यादीत प्रचंड घोळ असून, मृत्यू झालेले मतदार आणि स्थलांतरित मतदारांची नावे कायम असल्याची शंका बळावली आहे. महापालिका प्रशासनाने घोषित केलेल्या मतदार यादीमध्ये अंदाजे ११ प्रभागांमध्ये ३ ते १० हजार मतदारांची संख्या वाढली आहे, तर काही प्रभागांमध्ये मतदारांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे अधोरेखित मानले जात आहे. मतदारांची ही दुबार नावे यादीतून हटविण्यासाठी प्रशासनाने तयारी चालविली असल्याची माहिती आहे.
प्रभागनिहाय मतदार यादी
प्रभाग क्रमांक १ – ३३७६६
प्रभाग क्रमांक २ – २५४३७
प्रभाग क्रमांक ३- ३६९२९
प्रभाग क्रमांक ४- ३५२०८
प्रभाग क्रमांक ५- २७७४२
प्रभाग क्रमांक ६- २७३४२
प्रभाग क्रमांक ७ – २७९७१
प्रभाग क्रमांक ८- २४३०७
प्रभाग क्रमांक ९- १९०६९
प्रभाग क्रमांक १०- ३२२७०
प्रभाग क्रमांक ११ – ३४२५३
प्रभाग क्रमांक १२ – २८९७४
प्रभाग क्रमांक १३ – २८३२५
प्रभाग क्रमांक १४ – ३३७७०
प्रभाग क्रमांक १५ – २९२७१
प्रभाग क्रमांक १६ – ३४९६३
प्रभाग क्रमांक १७ – ३४३३४
प्रभाग क्रमांक १८ – ३०४७३
प्रभाग क्रमांक १९ – ३१८६९
प्रभाग क्रमांक २० – ३१८६
प्रभाग क्रमांक २१ – ४००५२
प्रभाग क्रमांक २२ – २८८६४

