महाराष्ट्र

रणधुमाळीला सुरुवात; काँग्रेसच्या रणनीतीचं सूत्र हिंगणीकरांच्या हाती

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
नगरपरिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या अंजनगाव सुर्जीमध्ये आता राजकीय समीकरणांना नवी छटा लाभत आहे. काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकताच निवडणूक व्यवस्थापनाचा मोर्चा हाती घेण्यासाठी एक धडाकेबाज आणि अनुभवी नेतृत्व पुढे सरसावले आहे. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. बबलूभाऊ देशमुख यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब हिंगणीकर यांची नगरपरिषद निवडणुकीसाठी ‘निवडणूक निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंगणीकर यांच्या राजकीय वाटचालीचे पानं उलटली की अनुभव, शिस्त आणि जनसंपर्काची दिमाखदार परंपरा ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहते. जिल्हा परिषदेच्या कारभारात त्यांनी दाखवलेले नेतृत्व आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दूरदृष्टी – या दोन्हींचा ठसा आजही नागरिकांच्या स्मरणात पक्का आहे. याच नेतृत्वगुणांमुळे काँग्रेसच्या स्थानिक किल्ल्याला आता नवी धार मिळणार असल्याची खात्री कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते.

या नियुक्तीचे वृत्त जाहीर होताच काँग्रेसच्या स्थानिक कार्यालयात उत्साहाचा जल्लोष उसळला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची झळाळी आणि विजयाची चाहूल स्पष्ट जाणवत होती. येणाऱ्या निवडणुकीत रणनीती आखणे, संघटनाला योग्य दिशा देणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरून टाकणे – या सर्व गोष्टींसाठी हिंगणीकर यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरणार असल्याचे मत शहर काँग्रेसमध्ये उमटू लागले आहे.

हिंगणीकर यांच्या नियुक्तीला शहर व तालुका काँग्रेसकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी राजकीय मोसमात त्यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्याची उमेद व्यक्त केली जात आहे. अंजनगाव सुर्जीच्या राजकारणात ही निवड काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकते, अशी कुजबुज आता प्रत्येक गल्लीतील निवडणूक चर्चांना नवी दिशा देत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.