नवनीत राणा यांच्याकडून हिंदू समाजाला विशेष आवाहन

अमरावती – भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात हिंदू समाजाला तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जनसंख्या संतुलन आणि धर्मरक्षणाच्या दृष्टीने हे आवाहन केले असून, त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, “काही लोक मोठ्या संख्येने मुले जन्माला घालून देशातील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मौलानाने चार बायका आणि १९ मुले असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत हिंदू समाजानेही किमान तीन ते चार मुले जन्माला घालावीत, जेणेकरून आपला धर्म आणि संस्कृती सुरक्षित राहील.”
त्या पुढे म्हणाल्या की, बंगाल आणि बांगलादेशातील घडामोडींवर सर्वांची नजर आहे. हिंदू समाज एकजूट राहिला तरच आपली ओळख टिकेल. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटोगे तो कटोगे’ या घोषणेचाही उल्लेख केला.
नवनीत राणा यांनी अलीकडेच बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली होती आणि सनातन धर्माच्या उदयासाठी प्रयत्नशील राहण्याचे संकल्प व्यक्त केले होते. त्यांच्या या नवीन विधानाला समर्थकांचे कौतुक मिळत असले तरी काहींनी यावर टीका करत हे वक्तव्य जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.
नवनीत राणा या नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जातात आणि अमरावतीतील राजकारणात सक्रिय राहतात. त्यांच्या या आवाहनामुळे येत्या काळात नवीन चर्चा होण्याची शक्यता आहे.

