महाराष्ट्र

“स्थगितीच्या वादळातही तेज ठामच; अंजनगावच्या रणांगणात अडसूळ–डकरे यांची धनुष्यबाणाला नवचैतन्याची शपथ!”

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या रणांगणात राजकारण तापले होते. प्रचाराचा ज्वार शिगेला पोहोचला असतानाच अचानक काही जिल्ह्यांतील प्रभागांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय समोर आला आणि अनेक कार्यकर्त्यांच्या उत्साहावर अल्पविराम उमटला. साधारण वीस जिल्ह्यांतील मतदार प्रभागांवर स्थगिती लागू झाल्याने राजकीय समीकरणांना अनपेक्षित वळण मिळाले.

अशा अस्थिर वातावरणात अंजनगाव सुर्जी येथे शिवसेना (शिंदे गट)च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्पृहा डकरे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवउर्जा संचारणारा संदेश दिला.

“प्रचार शिंगेला पोहोचला आहे, तो खाली येऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत अडसूळ म्हणाले, “ही स्थगिती आमच्यासाठी अडथळा नाही, उलट ही अतिरिक्त तयारीची सुवर्णसंधी आहे. आमचे नेते आता थेट रणांगणात उपस्थित राहू शकतील. कार्यकर्ते सक्षम आहेत, परिस्थितीचे भान ठेवून ते पुन्हा जोमाने झुंज देतील. आम्ही लढणार, जिंकणार आणि विजयी होणार—ही खात्री अढळ आहे.”

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्पृहा डकरे यांनीही याच धाडसाचा आवाज बुलंद करत म्हटले,
“अनपेक्षित स्थगिती आली तरी आमचा वेग थांबणारा नाही. प्रचार तेजीत आहेच. कितीही अडथळे आले तरी शेवटी विजयी होणार ते धनुष्यबाणच!”

याच धारेत डॉ. अतुल डकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत म्हटले,
“स्थगितीमुळे थोडीशी निराशा आली असली, तरी अडसूळ साहेबांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांचे मनोबल पुन्हा वाढले आहे. आम्ही नव्या दमाने, धाडसाने आणि निर्धाराने पुढे जाणार आहोत. अंजनगाव सुर्जीसाठी आपला संकल्प पवित्र आहे—शिवसेना (शिंदे गट)ला विजयी करायचेच. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. सत्याचा विजय अपरिहार्य असतो, आणि यावेळी तो विजय आपलाच आहे.”

अचानक आलेल्या या राजकीय ढगांनंतरही अंजनगाव सुर्जीच्या राजकारणात तापलेली हवा अजून थंड व्हायची चिन्हे नाहीत. उलट, स्थगितीच्या क्षणिक शांततेत नव्या उत्साहाचा ज्वार उसळत आहे; आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा ताठ कण्याने लक्ष्यभेदनाच्या तयारीत उभा आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.