महाराष्ट्र

“फुले वाड्याच्या अस्मितेचा प्रश्न; जिजाऊ ब्रिगेडची थेट शासनाला हाक”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :

पुण्याच्या इतिहासाचा तेजस्वी अविभाज्य ठेवा असलेल्या महात्मा फुले वाड्याचे भाडेतत्त्वावर खाजगी संस्थेकडे हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावाला जिजाऊ ब्रिगेडने ठाम नकार देत तीव्र आवाज उठविला आहे. अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून या ऐतिहासिक स्मारकाच्या ‘खाजगीकरण’ कल्पनाच समाजमनास न मान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्फत महात्मा फुले वाडा समता परिषदेकडे भाडेतत्त्वावर देण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, फुले दांपत्यांनी विणलेल्या सामाजिक समतेच्या विचारधारेची ही भूमी कोणत्याही एका संघटनेची मालकी कल्पनेपलीकडची आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाच्या सामाजिक चळवळीचे प्राणस्थान आहेत. अशा सार्वकालिक वारशाचे खाजगीकरण हे इतिहासाचा अपमान ठरेल, असा जिजाऊ ब्रिगेडचा ठाम युक्तिवाद आहे.

आजही महात्मा फुले वाडा सर्वसामान्यांसाठी उघडा असून विशेषतः महिलांसाठी तो प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. महिला जयंती, पुण्यतिथी आणि स्मरणदिनी अनेक महिला येथे येऊन अभंग गातात, विचार व्यक्त करतात आणि फुले दांपत्यांच्या कार्याशी नाते जपतात. एका संस्थेच्या ताब्यात हा वारसा दिला तर महिलांच्या भावनांना चटका बसेल, असा इशारा निवेदनात नोंदवला आहे.

याच अनुषंगाने जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी राज्यातील सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनाही पत्रव्यवहाराद्वारे कठोर विरोध नोंदविला आहे. शासनाने प्रस्ताव मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाची चेतावणी देत त्यांनी संघर्षाचा निर्धार व्यक्त केला.

निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष सारिका मानकर, प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, विभागीय कार्याध्यक्ष मीना कोल्हे यांच्यासह सुषमा कोकाटे, सोनल निमकाडे, शीतल बोके, जयश्री देशमुख, प्राजक्ता सरोदे, मीनाक्षी घुबडे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.