‘कडाक्याच्या थंडीतही शेकोटीभोवती पेटले निवडणुकीचे बोलते वातावरण’

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
गेल्या काही दिवसांत अंजनगाव सुर्जीवर हिवाळ्याने अक्षरशः धुक्याची चादर पांघरली आहे. पहाटेच्या वेळी तर गावभर दाट धुक्याचे दाट पांघरूण उतरते आणि संध्याकाळ होताच सरीराला झोंबणारी थंड हवा अंग गोठवून टाकते. तापमानातील जाणवणारी घसरण नागरिकांना घराबाहेर पडता क्षणभर विचार करायला लावते.
अशा कडाक्याच्या थंडीमध्ये गावातील चौक, वाड्या–पाड्यांमध्ये पेटलेल्या शेकोट्या मात्र जणू ऊबदार आश्रयस्थान ठरत आहेत. त्याभोवती गोळा झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे तेज आणि गप्पांच्या मैफलीत उमटणारा हशा या हिवाळी रात्रींना वेगळेच रंग देतो. थंड वाऱ्याशी झुंज देत, शेकोटीच्या लालचुटुक ज्योतीभोवती तयार होणारी मानवी उब गावाच्या सामाजिक नात्यांना नवे ऊबदारपण देताना दिसते.
या शेकोटींच्या उबेने फक्त शरीरच तापत नाही, तर गावच्या अंत:करणातही उष्णता पेटते—गप्पांचे विषय निवडणुकीकडेही वळतात. येणाऱ्या निवडणुकीच्या हालचाली, उमेदवारांची चर्चासत्रे, आगामी राजकीय समीकरणांचे अंदाज… थंडीची तीक्ष्ण धार आणि चर्चा यांचे तापमान दोन्हीच वाढत आहे.

