ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक
Trending

इतिहासाला उजाळा देत मेळघाटात गाविलगड उत्सव; जाणून घ्या किल्ल्याची अनोखी कहाणी…

19 नोव्हेंबर 1803 ला गाविलगडावर मराठे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं होतं. त्यावेळी किल्ल्याच्या किल्लेदाराचा मृत्यू झाला. त्यावेळी किल्लेदाराच्या पत्नीनं जौहर केलं होतं.

अमरावती : सातपुडा पर्वताच्या टोकावर इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या गाविलगड किल्ल्यावर बागलिंग या गावातून दीडशे ते दोनशे गड-किल्लेप्रेमींनी चढाई केली. अनोखा जल्लोष, प्रचंड उत्साह आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक थोर पुरुषांचा जयघोष करत ही मोहीम फत्ते केली. 14 डिसेंबर हा ‘गाविलगड उत्सव’ म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवरच गड-किल्लेप्रेमींनी गाविलगडाची चढाई केली. स्वराज्य प्रतिष्ठाननं या खास मोहिमेचं आयोजन केलं होतं.

 

असा आहे गाविलगड महोत्सवाचा उद्देश : “गाविलगडावर असणारी मुघलांची सत्ता उलथवून नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. या किल्ल्याचा किल्लेदार बेनिसिंह राजपूत होता. 19 नोव्हेंबर 1803 रोजी मराठ्यांविरुद्ध शिरसोली आडगाव या गावात इंग्रजांनी युद्ध जिंकल्यावर त्यांनी गाविलगडाच्या दिशेनं कूच केली. 13, 14 आणि 15 डिसेंबरला इंग्रजांनी गाविलगड वर हल्ला चढवला. या तिन्ही दिवशी बेनी सिंह राजपूत यांच्या नेतृत्वात गाविलगडावरील सैन्यानं इंग्रजांशी युद्ध केलं. नागपूरवरून मन्या बापू भोसले हे फौजेसह गाविलगडवर पोहचले. इंग्रजांना सुरुवातीला गाविलगड जिंकणं जड गेलं. मात्र 14 डिसेंबरला तुंबळ युद्धात बेनिसिंह राजपूत कामी आले. इंग्रजांच्या हाती लागायचं नाही म्हणून बेनिसिंह यांची पत्नी रूपवती हिच्यासह किल्ल्यावरील शेकडो महिलांनी जौहर पेटवून प्राणांची आहुती दिली. यानंतर आणखी एक दिवस मन्याबापू भोसले यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. मात्र ते सुद्धा कामी आले. त्यामुळं गाविलगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. गाविलगड किल्ल्यावरील ह्या ऐतिहासिक प्रसंगाला उजाळा देण्यासाठी दरवर्षी गाविलगड महोत्सवाच्या नावानं ही मोहीम राबविली जाते,” अशी स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी ‘खरा संवादच’शी बोलताना दिली.

 

अशी झाली गढ चढाई : चिखलदरा शहरापासून घाटाच्या खाली २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बागलिंगा गावात अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम जिल्ह्यातून गडकिल्ले प्रेमी सकाळी साडेसात वाजता पोहोचले. आठ वाजता गाविलगडाचा डोंगर चढण्यास सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत पहाड चढून संपूर्ण किल्ला पालथा घालण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मोहिमेत सहभागी इतिहास अभ्यासकांनी किल्ल्यावरील विविध बुरुज, महाल, कलाकृती याची माहिती मोहिमेत सहभागी गडकिल्लेप्रेमींना दिली.

 

पुस्तकाचं केलं विमोचन : गाविलगड किल्ल्याचा मुख्य जो प्रवेश मार्ग आहे त्या प्रवेशद्वारासमोर गाविलगडची गौरवगाथा या पुस्तकाचं विमोचन चिखलदराचे तहसीलदार जीवन मोरोणकर, महावितरणचे विधी अधिकारी प्रशांत लहाने, प्राचार्य डॉ. पृथ्वीसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.