ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

लोकशाहीचा जागर अंजनगाव सुर्जीत; वाढलेल्या मतदानाने रंगला निवडणुकीचा उत्सव

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या निवडणुकीने आज लोकशाहीच्या मंदिरात जनतेचा उत्सव साजरा केला. पहाटेपासूनच मतदारांच्या पावलांनी मतदान केंद्रांकडे वाट धरली आणि दिवसभर शहरभर लोकशाहीचा नाद घुमत राहिला. नागरिकांच्या जागरूक सहभागामुळे यंदा मतदानाची टक्केवारी विक्रमी ठरली असून सुमारे ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विविध प्रभागांतील मतदारांनी कोणताही तणाव न घेता, शांततेच्या वातावरणात आपला सार्वभौम हक्क बजावला. एखाद-दोन ठिकाणी किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरात कायदा-सुव्यवस्थेचा आदर्श नमुना पाहायला मिळाला.
नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार लोकनिर्णयाच्या रणांगणात उतरले होते. विविध पक्षांचे झेंडे, घोषणा आणि आश्वासने आज थांबली असून काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम तसेच अपक्ष उमेदवारांचे भविष्य आता मतपेटीत सीलबंद झाले आहे.
मतदानाची अंतिम आकडेवारी संकलनाचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत नगरपरिषदेच्या सत्तेचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एकूणच, यंदा अंजनगाव सुर्जीतील जनतेने अभूतपूर्व सहभाग नोंदवत लोकशाहीवरील आपला विश्वास पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केला आहे. आता या जनमतातून कोणत्या हातात शहराच्या विकासाची सूत्रे जाणार, याची उत्कंठा अवघ्या शहराला लागून राहिली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.