उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती: अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा, शिवसेना अन् इतर पक्षांत प्रवेश
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन या तीन दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगर : निवडणुका आल्या की राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे प्रवेश केले जातात. सध्या असंच चित्र संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे नेते शिवसेना आणि भाजपामध्ये, तर काँग्रेसमधील नेते उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाताना दिसत आहेत. विशेषतः उबाठाच्या उमेदवारांना आपल्याकडं ओढण्याकडं महायुती प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महानगर पालिकेत तीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला यंदा स्वतःच्याच पक्षाचं आव्हान असणार आहे.
सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांची पळवापळवी होतेच, तसा काहीसा प्रकार सध्या शहरात पाहायला मिळत आहे. विशेषतः उबाठातून अनेकांनी काढता पाय घेत शिवसेना किंवा भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेली महानगर पालिका त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मदतीनं हिसकावण्यासाठी जोरदार नियोजन महायुतीचं असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन यांच्यासारख्या तीन दिग्गज माजी महापौरांनी प्रवेश घेतला असून अनेक जुने कार्यकर्ते देखील फोडण्यात यश आलं आहे. तर काही कट्टर शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानं महानगर पालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवणं त्यांना अवघड जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुतीत उमेदवारांचा प्रवेश मात्र जागा वाटप ठरेना : महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजपा आणि शिवसेनेत आतापर्यंत चार वेळा बैठका पार पडल्या तर राष्ट्रवादीसोबत वेगळी बैठक भाजपा तर्फे घेण्यात आली. भाजपाला 115 पैकी 80 जागा, शिवसेनेला 80 जागा लढवण्याची मागणी आहे, तर राष्ट्रवादीला किमान 35 जागा मिळाव्या अशी मागणी बैठकांमध्ये होत आहे. त्यावर अद्याप तोडगा निघाला नसला तरी कोणत्या प्रभागात कोणाचा उमेदवार लढणार याबाबत खलबतं केली जात आहेत. बैठकीबाबत समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना, “किती जागांचा प्रभाग असावा अशी आज चर्चा झाली आहे. शिवसेना किती जागांसाठी इच्छुक आहे, याची यादी देखील दिलेली आहे. ही युती 22 तारखेपर्यंत झाली पाहिजे, यासाठी आम्ही पाऊलं टाकली आहेत. सर्वांनी यावर चर्चा केली आहे. एका ब्रेकनंतर भाजपा सेना असे 4 लोक बसून चर्चा होईल. जागा वाटप करताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी आमची प्रमुख भूमिका आहे. दोन तीन पायऱ्या चढलो आहोत, 50 टक्के बोलणी झाली आहे, 50 टक्के बाकी आहे. 2000 कार्यकर्त्यांमधून आम्हाला 105 लोक निवडायचे आहेत. जागांवर नाही, तर प्रभागावर आम्ही काम करत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.
जागा लगेच जाहीर होणार नाहीत : “आज आम्ही जागा जाहीर करू शकत नाही. आमचे कार्यकर्ते नाराज होतील,” असं मत राज्याचे मंत्री आणि भाजपाचे नेते अतुल सावे यांनी व्यक्त केलं. “आम्हाला महायुतीची सत्ता आणायची आहे, त्यामुळे एखाद्या दोन जागा इकडं तिकडं होतील. मोठा भाऊ छोटा भाऊ अशी काही चर्चा झालेली नाही. आमच्याकडं आचारसंहिता ठरली आहे. भाजपा सेनेतील एकमेकांच्या पक्षात नाही जाणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
उबाठा पक्षावर टीका : उबाठामध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते तथा माजी महापौर रशीद मामू यांनी पक्षप्रवेश केला. त्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. “काल त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी बोलावत नाही, म्हणून मामू जमा करायला सुरुवात केली आहे. काल एका मामूला त्यांनी प्रवेश दिला, वंदे मातरमला सभागृहात त्या रशीद मामू यांनी विरोध केला होता. पाकिस्तान की जय, असं ते म्हणाले होते,” अशी टीका महायुतीच्या नेत्यांनी केली.

