टेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अहिल्यानगर ते पंढरपूर श्रद्धेच्या रस्त्यावर 200 किलोमीटरची अनोखी ‘रनवारी’; फिटनेसला जोड देणारा आगळावेगळा उपक्रम

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपरूच्या दिशेनं चालत प्रस्थान करत आहेत. अहिल्यानगरमधील तरूणांनी एकत्र येत 'रनवारी' हा उपक्रम राबवला.

अहिल्यानगर : पारंपरिक वारीच्या भक्तिरसात आधुनिक फिटनेसची जोड देणारा आगळावेगळा उपक्रम ‘रनवारी 2025’ यशस्वीरीत्या पार पडला. अहिल्यानगरहून प्रारंभ झालेली ही धावणारी वारी म्हणजे भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि शारीरिक शिस्तीचे प्रतीक ठरली.

अहिल्यानगरच्या तरूणांची ‘रनवारी’ : आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यासह देशभरातून लाखो भाविक आणि वारकरी ‘माऊली माऊली’ नामाचा जयघोष करत, टाळ-मुदंगाच्या गजरात पंढरपूरकडं प्रस्थान करत आहे. वारी काळात अनेकजण आपापल्या पद्धतीनं वारीत सहभागी होतात. अनेकजण सायकलवारी, मोटारबाईकवारी यांसह अनेक पद्धतीनं तरुणाई आषाढी साजरी करत असतात. आता अहिल्यानगरच्या तरुणांनी एकत्र येत ‘रनवारी’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला. शनिवार 21 जूनला सकाळी 5 वाजता माळीवाडा इथल्या श्री विशाल गणपती मंदिरापासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. श्रीगणेशाचा आशीर्वाद घेऊन उत्साहात धावपटूंनी पंढरपूरच्या दिशेनं धाव सुरू केली. सलग दोन दिवसांच्या रिले पद्धतीत, निवडक 18 धावपटूंनी सुमारे 200 किमीचे अंतर पार करत रविवारी 22 जूनला सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हा अध्यात्मिक प्रवास संपन्न केला.

 

 

रनवारीसाठी निवडक धावपटूंची संधी : पहिल्या धावत्या वारीमध्ये केवळ ‘टीम ARC’ या संघातील निवडक धावपटूंना सहभागी होण्याची संधी दिली होती. प्रत्येक टप्प्यावर धावपटूंनी जबाबदारीनं आपलं योगदान दिलं. रूट प्लॅनिंग, हायड्रेशन, लॉजिस्टिक सपोर्ट, मेडिकल मदत, जेवण आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आलं होतं. जे संघभावनेतून प्रभावीपणे पार पाडलं.

पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात करणार रनवारी : “रनवारी सामाजिक जाणीव, फिटनेस, आणि अध्यात्म यांचा संगम ठरली. शहरभरातून या अभिनव उपक्रमाचं कौतुक करण्यात येत आहे. ‘रनवारी २०२५’ ही सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात करून सर्व अहिल्यानगरच्या धावपटूंना खुला करून साजरा करण्यात येईल, असं आयोजकांनी सांगितलं.

रनवारीत या धावपटूंचा सहभाग : या रनवारीमध्ये विलास भोजने, गौतम जायभाय, योगेश खरपुडे, ऋतिक पटेल, वैभव वाघ, सूर्यकांत पारधी, नीलम पंडित, स्मिता उकिर्डे, हरीश काबरा, भूषण मालू, शेखर आंधळे, जगदीप मकर, अल्ताफ पठाण, चेतन अग्रवाल, विजय फुलसौंदर, हर्षल अग्रवाल, निलेश संकलेचा, दिलीप पवार आदी सहभागी झाले होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.