विदर्भात भाजपाच ठरला ‘बिग बॉस’; १०० पैकी ५५ नगराध्यक्ष भाजपाचे तर १९ ठिकाणी काँग्रेसला यश
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात नंबर १चा पक्ष ठरला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातसुद्धा भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय.

नागपूर- विदर्भातील नागपूर, अमरावती या दोन विभाग मिळून नगर परिषद आणि नगर पालिकेच्या एकूण १०० जागेवर निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपानं ५८ जागांवर यश मिळवलेले आहे. तर काँग्रेसला १९ जागांवर समाधान मानावे लागलं. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाला ११ तर शिवसेनेला (उबाठा) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दोनच जागा मिळाल्या आहेत.
नागपूरचा गड भाजपानं राखला:- भारतीय जनता पक्षानं परत एकदा नागपूरचा गड राखलेला आहे. भाजपाचे ५५० पैकी ३१७ नगरसेवक निवडून आलेले आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेला २५, राष्ट्रवादीला ६ आणि काँग्रेसला १२० नगरसेवक निवडून आणता आले.
इतिहासात पहिल्यांदा कामठीत भाजपाचा नगराध्यक्ष-कामठीत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ फुललेले आहे. कामठी नगरपरिषदेच्या स्थापनेपासूनच इथे काँग्रेसचे वर्चस्व राहिलेलं आहे. यावेळी भाजपाचे अजय अग्रवाल विजयी झालेत. अवघ्या काही मतांनी अजय अग्रवाल मतांनी विजयी झाल्यानं काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
चंद्रपुरात मुनगंटीवारांना धक्का तर वडेट्टीवार जोमात:- चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार किंगमेकर ठरले आहेत. चंद्रपुरात भाजपाचे ५आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात दिली आहे. ब्रम्हपुरी, मुल, नागभीड, घुग्गुस, बल्लारपूर, वरोरा आणि राजुरा नगरपरिषदेवर काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदी निवडून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात काँग्रेसनं भाजपाचा दारुण पराभव करत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसनं मुसंडी मारली आहे.
वर्ध्यात भाजपाला सूर गवसला नाही- वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेले राज्यमंत्री पंकज भोयर यांना मतदारांनी धक्का दिला आहे. वर्धामध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचे सुधीर पांगुळ विजयी झाले. तर देवळीत माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसलेला आहे. ६ पैकी ३ ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. जिल्ह्यात ७० ते ८- टक्के नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले आहेत, असा दावा पंकज भोयर यांनी केलाय.

