महाराष्ट्र

वादविवादाच्या रंगमंचावर वैचारिक तेज; कु. दर्पण नामदेवराव गवईच्या मांडणीने वेधले सर्वांचे लक्ष

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती कृष्णाबाई सारडा इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी आयोजित आंतरशालेय वादविवाद स्पर्धा ही केवळ स्पर्धा न राहता विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचा, अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा आणि प्रभावी वक्तृत्वाचा उत्सव ठरली. “कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्यांसाठी धोका आहे का?” या अत्यंत समकालीन व ज्वलंत विषयावर विविध तालुक्यांतील 12 शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे आपले विचार मांडत सभागृहात वैचारिक चैतन्य निर्माण केले.

कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात डॉ. माधुरी सारडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. स्पर्धेत वक्त्यांनी केवळ मुद्देसूद मांडणीच नव्हे, तर उदाहरणे, तर्कशुद्ध विचार आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा सुरेख संगम घडवून आणला.

या वादविवाद स्पर्धेत सीताबाई संगई मुलांच्या शाळेतील मिहिर राजेंद्र टाक याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलची झिकरा अयमन युनुस शाह हिने द्वितीय आणि सीताबाई संगई कन्या स्कूलची वसुंधरा मोहन पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला.

मात्र, उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते श्रीमती कृष्णाबाई सारडा इंग्लिश स्कूलची कु. दर्पण नामदेवराव गवई हिने. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल अभ्यासपूर्ण मांडणी करताना तिने नोकऱ्यांवरील परिणाम, मानवी कौशल्यांचे महत्त्व आणि भविष्यकाळातील संधी यांचा समतोल दृष्टिकोनातून विचार मांडला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण शैलीने, स्पष्ट शब्दांत मांडलेल्या मुद्द्यांनी आणि प्रभावी वक्तृत्वाने परीक्षकांसह प्रेक्षकांची दाद मिळवली. याच उल्लेखनीय कामगिरीमुळे तिला प्रोत्साहनपर पारितोषिकाने गौरविण्यात आले. तिच्या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून भविष्यातील उज्ज्वल वाटचालीची आशा व्यक्त करण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. नमिता मालानी, डॉ. अनिकेत भुयार आणि आशिष हिरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा पंचमीया आणि किरण पारवे यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन सौ. संगीता ढोके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. आशिष शिंदिजामेकर आणि कल्पेश नवले यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉ. अमर सारडा, डॉ. माधुरी सारडा, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वरुण वर्मा, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. कुंदा नायडकर, पर्यवेक्षिका सौ. माया चक्रनारायण तसेच संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे, विशेषतः कु. दर्पण नामदेवराव गवई हिचे मनापासून अभिनंदन केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.