महाराष्ट्र

लोकविश्वासाच्या शपथेवर नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांचा भावस्पर्शी पदग्रहण सोहळा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या स्व. भावे सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्या पदग्रहणाचा सोहळा शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनात नवा अध्याय उघडणारा ठरला. शिस्त, उत्साह आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या समारंभाला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी तसेच शहरातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास पावित्र्याची आणि सकारात्मकतेची किनार लाभली. पदभार स्वीकारताना कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने नगराध्यक्ष अविनाश गायगोले भावूक झाले. हा क्षण उपस्थितांसाठी केवळ राजकीय नव्हे, तर मानवी भावनांनी ओथंबलेला ठरला.
या सोहळ्यास भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी, शिवसेना (शिंदे गट) चे प्रतिनिधी, अपक्ष नगरसेविका आयशा बानो यांचे पती अकबर शाह, काँग्रेसचे आशिक अन्सारी, प्रियंका मालठाणे, योगिता प्रदीप देशमुख, मनीष मेन, उज्वला विलास कविटकर, मोहम्मद रेहान अब्दुल मुनाफ, मोहम्मद आशिक अन्सारी, प्रियंका निलेश आवडकर, रामन्य रविंद्र आवंडकर, प्राविण नेमाडे, उमा ओळंबे, उमेश भोंडे, शाहिन परवीन यांचे पती मुजम्मील अली, नसीमा बी., आफरीन कौसर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मात्र काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच समाजवादी पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या.
मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी विकासालाच आपला केंद्रबिंदू असल्याचे ठामपणे सांगितले.
“पक्षीय भिंती बाजूला सारून अंजनगाव सुर्जीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी सुस्पष्ट विकास आराखडा तयार असून शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्याचा माझा निर्धार आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातूनच करीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी सर्व नगरसेवक व नागरिकांच्या सहकार्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे कार्यकर्ते मुकुंद संगई होते. माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी प्रास्ताविकातून शहराच्या विकासाचा आढावा मांडला. सूत्रसंचालन उत्तमराव मुरकुटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका मालठाणे यांनी केले.
मुख्याधिकारी विजय लोहकरे, भाजपाचे पदाधिकारी सुधीर रसे, गजानन कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.