महाराष्ट्रात लोकशाही, संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल मोदी सरकारकडून कोश्यारी महाशयांना पद्मभूषण; संजय राऊतांचा घणाघात, विकृत म्हणत हर्षवर्धन सपकाळही बरसले
महाराष्ट्रात लोकशाही, भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केल्याचे राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीवर गरळ ओकलेल्या तसेच महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांवर नको त्या भाषेमध्ये टिप्पणी केलेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने महाराष्ट्रामध्ये शिव, शाहू, फुले प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक पुरोगामी विचारवतांनी सुद्धा कोश्यारींना दिलेला सन्मान हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सुद्धा कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते, छान अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल…
राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!छान! दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोश्यारींना पद्मभूषण देण्यात आल्यानंतर हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी संविधानाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संविधान पदाचा त्यांनी अपमान केला आहे. शिव शाहू फुलेंचा अपमान करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात आला असून कोश्यारी हा विकृत माणूस असल्याचा हल्लाबोल सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सोशल मीडियातही संतापाची लाट
प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, सोशल मीडियामध्ये सुद्धा कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार दिल्याने संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा अशा पद्धतीने सन्मान करण्यात येत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृती संस्कृतीसाठी उचित नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियामधून उमटत आहे. दुसरीकडे शिंदे गटासह भाजपने कोश्यारींना मिळालेल्या पुरस्काराचं स्वागत केलं आहे.

